तैपेई : पूर्व तैवानला गुरुवारी दुपारी भूकंपाचा जोरदार तडाखा बसल्याचे अमेरिकेच्या भूगर्भशास्त्र सर्वेक्षण विभागाने सांगितले. यामुळे वाहतूक विस्कळीत झाली, तसेच १७ लोक जखमी झाले.

रिश्टर स्केलवर ६.१ तीव्रतेच्या या भूकंपाचे केंद्र हुआलीन शहराच्या वायव्येला आणि सुमारे १९ किलोमीटर खोलीवर होते, असे तायवानच्या सेंट्रल वेदर ब्यूरोने सांगितले. या भूकंपाचे धक्के संपूर्ण बेटावर जाणवले आणि यिलान व हुआलीन यांना जोडणारा महामार्ग बंद करण्यात आला.

राजधानी तैपेईत बहुमजली इमारती हलल्या, तर यिलान परगण्यात घाबरलेले शाळकरी विद्यार्थी त्यांच्या वर्गखोल्यातून बाहेर पळाले, असे वृत्तांमध्ये म्हटले आहे.

भूकंपामुळे शहराच्या रेल्वे स्थानकांवरील जलवाहिन्या फुटल्या आणि रेल्वे वाहतूक काही काळ स्थगित ठेवावी लागली. पूर्व किनाऱ्यावरील शाळा रिकाम्या करण्यात आल्या. विद्यार्थ्यांनी स्वसंरक्षणासाठी त्यांच्या बॅगा डोक्यावर धरल्या होत्या. एका दाट वस्तीच्या भागात भूस्खलन झाल्याचे टीव्हीवरील दृश्यात दिसत होते.

खाली कोसळणाऱ्या दगडांमुळे प्रसिद्ध अशा तारोको जॉर्ज नॅशनल पार्कमध्ये दोन गिर्यारोहक जखमी झाले. यापैकी एक मलेशियाचा होता, असे हुआलीन सरकारने सांगितले.

भूकंपाच्या केंद्रापासून सुमारे ११५ किलोमीटरवर असलेल्या तैपेईमध्ये लोकांना इमारती हलत असल्याचा भास झाला आणि एक बहुमजली इमारतीचा पाया हलल्यानंतर ती शेजारच्या इमारतीवर झुकत होती. हा अनुभव भीतीदायक असल्याचे रहिवाशांनी सांगितले. सुरक्षिततेसाठी तैपेईतील मेट्रो सेवा तासभराहून अधिक काळ बंद ठेवण्यात आली होती.