News Flash

चीनचं सुखोई-३५ विमान पडलं का?; तैवानच्या संरक्षण मंत्रालयाकडून स्पष्टीकरण, म्हणाले…

चीन आणि तैवानमध्ये मागील बऱ्याच काळापासून सुरु आहे संघर्ष

फोटो सौजन्य : रॉयटर्स

तैवानने आज चीनचे सुखोई-३५ फायटर जेट पाडल्याचा दावा करणारे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर काही तासांनी तैवानच्या संरक्षण मंत्रालयाने यासंदर्भातील स्पष्टीकरण दिलं आहे. ‘तैवानने चीने सुखोई विमान पाडलं?’ अशा मथळ्याच्या अनेक बातम्या सध्या इंटरनेटवर व्हायरल झाल्या आहेत. मात्र आम्ही हे वृत्त फेटाळून लावत आहोत. ही माहिती खोटी असून यामध्येही थोडीही सत्यता नाही, असं तैनावने स्पष्ट केलं आहे.

तैवानच्या संरक्षण मंत्रालयाने अशाप्रकारे खोट्या बातम्या देऊन लोकांची दिशाभूल केली जात असल्याचे म्हटले आहे. या खोट्या माहितीमुळे अनेकांचा चुकीचा समज होत असून हे पूर्णपणे अयोग्य आहे अशा शब्दांमध्ये तैवानने हे वृत्त फेक न्यूजचा प्रकार असल्याचे म्हटलं आहे. हवाई तसेच समुद्री सीमांचे रक्षण करण्यासाठी आम्ही सज्ज असून या सीमांवर आम्ही अधिक कटाक्षाने लक्ष ठेवणार आहोत. हवाई तसेच सागरी सुरक्षेसंदर्भातील परिस्थितीवर आम्ही लक्ष ठेऊन आहोत. यासंदर्भातील काही माहिती असल्यास आम्ही ती वेळोवेळी जारी करु. खोटी माहिती पसरु नये यासाठी आम्ही योग्य वेळी घडणाऱ्या घडामोडींची माहिती देण्याचा निर्णय घेतला आहे. खोट्या माहितीमुळे अशांतता निर्माण होऊ नये यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत असं तैवानच्या संरक्षण मंत्रालयाने जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकामध्ये म्हटलं आहे.

तैवानने अमेरिकन बनावटीच्या पेट्रियाट मिसाइल डिफेन्स सिस्टीमचा वापर करुन त्यांच्या हवाई हद्दीत शिरलेलं चीनचं सुखोई-३५ फायटर जेट पाडल्याचा दावा करणारा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला होता. तैवानने चीनला अनेकदा हवाई सीमांचे उल्लंघन न करण्याचा इशारा दिला होता. मात्र त्यानंतरही अनेकदा चिनी फायटर जेट्स तैवानच्या हवाई हद्दीचे उल्लंघन करत होती. आज तैवानने अखेर हवाई हद्दीचे उल्लंघन करणाऱ्या चिनी विमानाला लक्ष्य केल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र आता तैवानच्या स्पष्टीकरणानंतर हा दावा खोटा असल्याचे सिद्ध झालं आहे.

मागील बऱ्याच काळापासून दक्षिण चीनच्या समुद्रामध्ये चीन आणि इतर शेजारी देशांमध्ये सीमा प्रश्नांवर खटके उडत आहेत. त्यातच चीनचा शेजारी असणाऱ्या तैवानमध्येही चीनला होणारा विरोध वाढताना दिसत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 4, 2020 5:37 pm

Web Title: taiwan ministry of defence says taiwan shot down a plaaf su 35 is fake information scsg 91
Next Stories
1 “सरकारच्या उपाययोजनांमुळे अर्थव्यवस्था पुन्हा गतिमान होईल”
2 राहुल गांधी ‘रागा’वले, विकास गायब आहे म्हणत पोस्ट केली यादी…
3 दुसऱ्या महिलेशी लग्न केल्याचा राग, महिलेचा माजी प्रियकरावर अ‍ॅसिड हल्ला
Just Now!
X