गेल्या काही दिवसांपासून चीन आणि तैवानमधील तणाव टोकाला गेल्याचं दिसत आहे. तैवानच्या संरक्षण मंत्र्यांनी फायटर जेट, टँक आणि युद्धनौका यांच्या तयारीचा एक व्हिडीओ जारी करत चीनला इशारा दिला आहे. आम्ही राष्ट्राच्या सुरक्षेसाठी कटिबद्ध आहोत आणि आम्ही पूर्णपणे तयार आहोत, असं संरक्षण मंत्री म्हणाले. काही दिवसांपूर्वी चीनच्या फायटर जेटनं तैवानच्या हवाई हद्दीत प्रवेश केला होता. त्यानंतरही तैवाननं चीनला इशारा दिला होता.

चीनच्या हवाईदलानं अनेकदा तैवानच्या हवाई सीमेचं उल्लंघन केलं आहे. चीन तैवानला आपली भूमी मानतो. परंतु तैवान यांपूर्वी स्वत:ला स्वतंत्र आणि लोकशाही असलेलं राष्ट्र घोषित केलं आहे. दरम्यान, आपली ताकद अधिक असून भविष्यात तैवान चीनचा भाग बनेल असं चीनला वाटत आहे. तैवाननं अमेरिकेसोबत ६२ अब्ज डॉलर्समध्ये एफ-१६ विमानांच्या खरेदीचा करार केला त्यावेळी चीन आणि तैवानमधील तणाव अधिक वाढला. या करारामुळे चीनचा तिळपापड झाला होता. या कराराअंतर्गत अमेरिका तैवानला ९० अत्याधुनिक फायटर जेट देणार आहे आणि त्यामध्ये अत्याधुनिक शस्त्रास्त्रांचाही समावेश असेल.

अमेरिका आणि तैवानच्या या करारानंतर चीननं तैवाला खुली धमकी दिली होती. जर तैवान या करारातून मागे हटला नाही तर पीपल्स लिबरेशन आर्मी कारवाई करेल आणि तैवानची एअरफिल्ड उद्ध्वस्त करून टाकेल, असं चीननं म्हटलं होतं. चीननं तैवानला दिलेल्या धमकीनंतर अमेरिकेनंही यात उडी घेत तैवानच्या सुरक्षेसाठी आपण कटिबद्ध असल्याचं म्हटलं होतं. तसंच कोणतीही किंमत मोजावी लागली तरी अमेरिका तैवानची सुरक्षा करेल, असंही अमेरिकेचे उप-परराष्ट्रमंत्री क्लार्क यांनी सांगितलं होतं. यापूर्वी चीननंदेखील तैवानला शस्त्रास्त्र पुरवण्याचा निर्णय घेतला होता. तर दुसरीकडे अमेरिकेनं तैवानला पीएससी ३ एअर डिफेन्स मिसाईल सिस्टम देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर चीनचा तिळपापड झाल्याचं पाहायला मिळालं होतं.