‘ताजमहाल’ आणि आयोद्धेतील ‘बाबरी मशिदी’च्या जागेवर सुन्नी वक्फ बोर्डाची मालकी नाही, ताजमहाल ही भारताची संपत्ती आहे. त्यामुळे त्यावर कोणीही आपला हक्क सांगू शकत नाही. ज्या मुघल सम्राट शहाजहाँने हा ताजमहाल बांधला त्यांनी वक्फ बोर्डाला याचे कोणतेही लिखित अधिकार दिलेले नाहीत, ही बाब कायम लक्षात ठेवा. अशा शब्दांत मुघलांचे वंशज वाय. एस. तुसी यांनी म्हटले आहे. ते एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. तुसी हे शेवटचा मुघल सम्राट बहाद्दुर शहा जफर यांचे पणतू आहेत.

अयोद्धेत राम मंदिर का उभारले जाऊ नये अशी भुमिका मांडताना तुसी म्हणाले, मंदिर न उभारण्याबाबत मला कुठलेही ठोस कारण दिसत नाही. विविध समाजांना एकत्र आणण्याला माझा पाठींबा आहे. सुन्नी वक्फ बोर्ड हे जमीन बळकावणारे मोठे संघटन आहे. त्यांच्या कार्यालयात खुर्च्या आणि टेबलही नाहीत. मग ते ताजमहालची देखभाल कशी करतील? असा सवाल यावेळी त्यांनी उपस्थित केला. वक्फ बोर्डाच्या लोकांना केवळ माध्यमांचे लक्ष वेधून घ्यायचे असते त्यासाठी ते हिंदू आणि मुस्लिमांमध्ये भांडणे लावण्याचे काम करीत असतात, असा सणसणीत आरोपही तुसी यांनी केला आहे.

तुसी म्हणाले, मुघलांचे थेट वंशज या नात्याने मुघलांनी बांधलेल्या इमारतींच्या देखभालीसाठी मुत्तवलींची (ट्रस्टी) नेमणुक करावी यासाठी मी दाखल केलेली याचिका अद्यापही सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे. या सर्व मालमत्ता मला भारत सरकारच्या स्वाधिन करायच्या आहेत.

ताजमहाल ही देशाची संपत्ती आहे. त्यामुळे त्यावरुन कोणालाही राजकारण करण्याचा अधिकार नाही; असे सांगताना तुसी म्हणाले, मी हिंदू महासभा आणि रा. स्व. संघाच्या कार्यकर्त्यांना शहाजहाँच्या उरुसासाठी (जत्रा) निमंत्रण देत आहे. हा उरुस येत्या रविवारी समाप्त होत आहे. यासाठी ३५ हजार लोक हजेरी लावणार आहेत. या उरुसाच्या शेवटच्या दिवशी शहाजहाँच्या कबरीवर १,१११ मिटर लांबीची सप्तरंगी चादर वाहण्यात येणार आहे.