ताज महाल ही मुघल बादशाह शाहजहान व त्याची पत्नी मुमताज महल यांची कबरच असल्याचं प्रतिज्ञापत्र पुरातत्व विभागानं आग्रा कोर्टामध्ये सादर केलं आहे. त्यामुळे ताज महाल ही मुमताजची कबर आहे की शिवमंदीर या संदर्भात गेल्या अनेक दशकांपासून सुरू असलेल्या वादावर पडदा पडला आहे.
राजेश कुलश्रेष्ठ यांनी स्थानिक न्यायालयात या संदर्भात खटला दाखल केला होता. यावेळी पुरातत्व विभागाच्या वतीने वकिल अंजनी शर्मा यांनी प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. मुमताझ या बेगमच्या स्मृतीनिमित्त बादशहा शाहजहानने ताज महाल बांधल्याचे या प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आले आहे. ताज महाल ही कबर नसून वास्तवात ही वास्तू म्हणजे शिवमंदिर असलेले तेजोमहल असल्याचं सांगत जे काही पुरावे सादर करण्यात आले होते, ते सगळे काल्पनिक असल्याचं शर्मा यांनी कोर्टाला सांगितलं आहे. तसंच ताज महालचा कुठला भाग पर्यटकांसाठी खुला असावा व कुठला नसावा या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने याआधी आदेश दिले असल्याचा दाखला देत आता नव्यानं त्यावर विचार करण्याची गरज नसल्याचंही शर्मा म्हणाले आहेत.

पुरातत्व खात्याच्या अधिकाऱ्यांच्या सांगण्यानुसार हा सगळा वाद सुरू झाला तो पु. ना. ओक यांनी लिहिलेल्या पुस्तकापासून. ताज महाल नव्हे तेजोमहल असं सांगत ओक यांनी ही वास्तू शिवमंदिर असल्याचा दावा केला व तो सिद्ध करण्यासाठी पुरावे दिले. मात्र, हे पुरावे काल्पनिक असल्याचा दावा पुरातत्व खात्याच्या अधिकाऱ्यांनी केला आहे.

ओकांनी हे पुस्तक प्रकाशित केल्यापासून हा वाद सुरू असून राजकारणी आपल्या परीनं त्यात भर टाकत आले आहेत. त्यामुळेच आग्रा कोर्टात अनेक खटले दाखल झाले असून ताज महालचं मूळ शिवमंदिरात असल्याच्या याचिका करण्यात आल्या आहेत. शिवसेनाही ताज महालजवळील दसरा घाटावर वरचेवर भगवान शंकराच्या आरतीचं आयोजन करते. हे हिंदू मंदिर असल्यामुळे ताज महालमध्ये नमाज पढण्यात येऊ नये अशी मागणीही अनेक हिंदू संघटना वरचेवर करीत असतात.

ताज महालला शिवमंदिर घोषित करावे आणि सत्यच बघायचं असेल तर या वास्तुचे बंद असलेले सगळे भाग खुले करावेत आणि जे दिसेल त्याची नोंदणी करावी अशी मागणीही याचिकेद्वारे करण्यात आली होती.

ताज महाल ही ऐतिहासिक वारसा असलेली वास्तू असून जगभरातून पर्यटक ती बघायला येत असतात, त्यामुळे ती अशा वादाचा विषय होऊ नये अशी अपेक्षा आग्रा टुरीस्ट वेलफेअर चेंबरचे अध्यक्ष प्रल्हाद अगरवाल यांनी व्यक्त केली आहे. ताज महाल भारताच्या इतिहासाचा भाग असून ते देशाचे एक प्रतीकही बनले असल्याचे अगरवाल म्हणाले.