भारतीय वंशाचे ऑस्ट्रेलियातील उद्योगपती पंकज ओस्वाल यांच्याकडून पर्थ येथे बांधण्यात येत असलेली ताजमहालची प्रतिकृती ‘ताजमहाल ऑन द स्वान’ स्थानिक प्रशासनाकडून बेकायदा ठरविण्यात आलेली आहे. ओस्वाल यांनी मोठय़ा प्रमाणावर कराची रक्कम भरलेली नसून बांधकाम कायद्याचेही उल्लंघन केल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. त्यामुळे ही वास्तू उद्ध्वस्त केली जाण्याची शक्यता आहे.

पंकज आणि त्यांची पत्नी राधिका ओस्वाल यांनी भारतातील ताजमहालची प्रतिकृती पर्थमधील स्वान नदीच्या काठावर उभारण्याचा निर्णय घेतला होता. १७ एकर जागेमध्ये सात हवेल्या, मंदिरे, व्यायामशाळा, जलतरण तलाव आणि वाहनतळाची भव्यदिव्य व्यवस्था असलेले हे बांधकाम अर्धवट झालेले आहे. पर्थमधील हे सर्वात खर्चीक आणि महागडे घर आहे. या बांधकामावर आतापर्यंत तब्बल २२ दशलक्ष डॉलर एवढय़ा मोठय़ा प्रमाणात खर्च करण्यात आला आहे.

ओस्वाल यांना खत कारखान्यात मोठय़ा प्रमाणात नुकसान सोसावे लागले. तसेच त्यांनी कर न भरल्याचा ठपका ठेवण्यात आला त्यामुळे या प्रतिकृतीचे काम थांबविण्यात आले होते. गतवर्षी ही वास्तू उद्ध्वस्त करण्याबाबत ओस्वाल दाम्पत्याकडून लेखी घेण्यात आले होते. त्यानुसार ही वास्तू ३० सप्टेंबर रोजी पाडण्यात येणार आहे. मात्र त्या दृष्टीने अद्याप कोणतीही तयारी करण्यात आलेली नाही.