सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर ताजमहाल आमची संपत्ती आहे असा दावा करणा-या उत्तर प्रदेश सुन्नी वक्फ बोर्डाची भूमिका नरमली आहे. ताजमहाल ही देवाची संपत्ती आहे असं त्यांनी म्हटलं आहे. ताजमहाल देवाची संपत्ती आहे, पण व्यवहारिक वापरासाठी ही वक्फ बोर्डाची संपत्ती असल्याची नोंद करण्यात यावी असंही ते बोलले आहेत.

गेल्या आठवड्यात सुनावणीदरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने वक्फ बोर्डाला सुनावत ताजमहाल तुमची संपत्ती आहे हे सिद्ध करणारे शाहजहानने स्वत: स्वाक्षरी केलेली कागदपत्रं सादर करण्याचा आदेश दिला होता. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण खात्याने केलेल्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने हा आदेश दिला होता. कागदपत्रं सादर करण्यासाठी वक्फ बोर्डला एका आठवड्याचा अवधी देण्यात आला होता. त्याप्रमाणे मंगळवारी झालेल्या सुनावणीत वक्फ बोर्डाने ताजमहाल देवाची संपत्ती असल्याचं म्हटलं आहे. सोबतच आपल्याकडे शाहजहाँने स्वाक्षरी केलेली कोणतीही कागदत्रं नसल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.

कोणतीही व्यक्ती ताजमहालवर मालकी हक्क सांगू शकत नाही असंही वक्फ बोर्डाने सांगितलं आहे. कोणत्याही मालकीविना आम्ही ताजमहालची देखरेख करु शकतो असंही ते बोलले आहेत. बोर्डाने पुरातत्व विभागाकडे फक्त देखरेख करण्यासाठी ताजमहाल आमची संपत्ती म्हणून नोंद करावी अशी विनंतीही केली आहे.

भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण खात्याने मात्र मालकी हक्काच्या कोणत्याही कागदपत्रांवर स्वाक्षरी करण्यास नकार दिला आहे. यामुळे गोंधळ निर्माण होईल आणि लाल किल्ला तसंच फतेहपूर सिकरी यांच्यावरही मालकी हक्काचा दावा होईल असं मत नोंदवलं आहे. २७ जुलैला याप्रकरणी पुढील सुनावणी होणार आहे.