आग्र्याच्या ताजमहालचे सौंदर्य न्याहाळणं आता महाग झालं आहे. कालपासून(दि.10) येथे प्रवेश शुल्कात वाढ करण्यात आली आहे. नव्या तिकीट दरांनुसार पर्यटकांना आता 50 रुपयांऐवजी 250 रुपये शुल्क आकारलं जाणार आहे. तर परदेशी पर्यटकांसाठी 1300 रुपये शुल्क आकारलं जाणार आहे. याशिवाय सार्क देशांमधून आलेल्या पर्यटकांना 540 रुपयांऐवजी 740 रुपये शुल्क आकारलं जाईल.

गर्दी आटोक्यात आणून ताजमहालच्या मुख्य ढाच्यावरील भार कमी करण्यासाठी भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाद्वारे हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. 200 रुपयांचं हे शुल्क मुख्य कबरीच्या दर्शनासाठी आकारण्यात येणार आहे. इंडियाटुडेच्या वृत्तानुसार 2016 नंतर ताजमहालच्या तिकीट दरात झालेली ही आठवी दरवाढ आहे. यापूर्वी भारतीय पर्यटकांना 50 रुपये आणि विदेशी पर्यटकाला 1100 रुपये मोजावे लागत होते.