भाजपाचे नाराज खासदार आणि अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधला. ते म्हणाले, लोकसभा निवडणुकीची घोषणाही झाली आहे त्यामुळे आता तरी एखादी पत्रकार परिषद घ्या. आपण आजवर एकही स्वतंत्र आणि निष्पक्ष पत्रकार परिषद घेतलेली नाही, असं करणारे आपण इतिहासातील एकमेव पंतप्रधान आहात असा टोलाही त्यांनी मोदींना लगावला आहे.


सिन्हा यांनी ट्विट करुन आपली भुमिका मांडली आहे. ते म्हणाले, जगातल्या लोकशाहीच्या इतिहासात मोदी असे एकमेव पंतप्रधान आहेत. ज्यांच्या कार्यकाळात एकही प्रश्नोत्तरांचा कार्यक्रम झाला नाही. त्यामुळे असलं सरकार बदलण्याचा आणि एका चांगल्या नेतृत्वाने देशाचा कार्यभार सांभाळण्याची हीच योग्य वेळ आहे. त्यामुळं आता मोदींनी आपल्या सर्व रंगढंगातून बाहेर यायला हवं.

सिन्हा मोदींना उद्देशून म्हणाले, आपल्या कार्यकाळातील शेवटच्या आठवड्यात, महिन्यांत आपण उत्तर प्रदेश, बनारस आणि देशाच्या अन्य भागांमध्ये १५० विविध योजनांच्या घोषणा केल्या. तांत्रिक दृष्टीने हे आचारसंहितेचे उल्लंघन होत नसले तरी निश्चितच हा देखील मला एक जुमलाच वाटतोय.