देशाला स्वातंत्र्य मिळून ६७ वर्षे लोटली, पण आजही त्यांच्या आयुष्याचा प्रत्येक क्षण दहशतीच्या सावटाखालून सरतो. भारत आणि पाकिस्तानदरम्यानच्या आंतरराष्ट्रीय सीमेवर राहणाऱ्या भारतीय हद्दीतील गावांची ही कहाणी. गेल्या ६७ वर्षांत दोन्ही देशांतील लष्कराच्या गोळीबारात, बॉम्बहल्ल्यांत त्यांची घरे अगणित वेळा बेचिराख झाली आहेत. आता तर पाकिस्तानकडून होत असलेल्या बेछूट गोळीबारात या गावांतील निष्पाप ग्रामस्थांचा जीव जातो आहे. त्यामुळेच हतबल झालेल्या या गावांतील जनता आता ‘एकदाचा काय तो या संघर्षांचा सोक्षमोक्ष लावून टाका,’ अशी आर्त हाक केंद्र सरकारला घालत आहे.
आंतरराष्ट्रीय सीमेपासून पाच किमी अंतरावर असलेल्या अर्निया गावाला पाक सैन्याकडून सध्या सुरू असलेल्या हल्ल्यांचा सर्वाधिक फटका बसला आहे. यापूर्वीही अनेकदा पाक लष्कराकडून रात्रीच्या वेळेस असे अचानक हल्ले व्हायचे. आता तर दिवसाढवळय़ा पाकिस्तानकडून गोळीबार आणि रॉकेटहल्ले केले जात आहेत, असे येथील ग्रामस्थांनी म्हटले आहे. या हल्ल्यांच्या भीतीने गावातील रहिवाशांना वेळोवेळी स्थलांतर करावे लागत आहे. ‘आम्ही वारंवार स्थलांतर करण्याला कंटाळून गेलो आहोत. या संघर्षांचा एकदा सोक्षमोक्ष लावून टाकला पाहिजे,’ असे गोपाळ दास या ग्रामस्थाने म्हटले.
ंमायभूमीतच निर्वासिताचं जीणं
अर्नियाच्या सीमेजवळील पट्टय़ात राहणाऱ्या शेकडो रहिवाशांनी सध्या देओली येथील एका माध्यमिक शाळेत आश्रय घेतला आहे. ‘आपल्याच गावात आम्ही निराश्रित झालो आहोत,’ अशी भावना ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत. ‘रात्रीच्या काळोखात झालेल्या हल्ल्यांनंतर जीव वाचवण्यासाठी घरातलं काहीही सामान न घेता आम्हाला पळून यावं लागलं. ‘आमच्याच देशात आम्ही निर्वासिताचं जीणं जगत आहोत,’ अशी प्रतिक्रिया गिरधारी लाल याने दिली.
मदतछावणीतही जगण्याची कुचंबणा
देओली येथील शाळेत उभारलेल्या मदत छावणीत लष्कर आणि स्थानिक प्रशासनाकडून या ग्रामस्थांना मदत पुरवली जात आहे. मात्र या मदत छावण्यांमध्ये राहणे कठीण बनत चालल्याचे काही ग्रामस्थांनी सांगितले. ‘शाळेच्या इमारतीत तर पाय ठेवायलाही जागा नाही. काल रात्री आलेल्या सोसाटय़ाच्या वाऱ्याने आमचा तंबू उखडला गेला. त्यानंतर अख्खी रात्र आम्हाला पावसात भिजत घालवावी लागली,’ असे कुलदीप याने म्हटले.