करोना व्हायरसचा पादूर्भाव रोखण्यासाठी लॉकडाउनची कठोरपणे अंमलबजावणी करा, असे निर्देश केंद्र सरकारने राज्यांना दिले आहेत. करोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या दररोज वाढत आहे. करोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या ४०० च्या पुढे गेली आहे. लॉकडाउनच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कायदेशी कारवाई करा असे केंद्राने राज्यांना पाठवलेल्या नोटमध्ये म्हटले आहे. हिंदुस्थान टाइम्सने हे वृत्त दिले आहे.

“ज्या भागांमध्ये लॉकडाउन घोषित केले आहे. तिथे कठोरपणे अंमलबजावणी करा असे राज्यांना सांगण्यात आले आहे. लॉकडाउनचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यास सांगण्यात आले आहे” पीआयबीच्या टि्वटरवर ही माहिती देण्यात आली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या टि्वटनंतर हे निर्देश देण्यात आले आहेत. काही लोक अजूनही लॉकडाउन गांभीर्याने घेत नाहीयत असे पंतप्रधान मोदी आपल्या टि्वटमध्ये म्हणाले होते.

काय म्हणाले मोदी
करोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी देशभरात करण्यात आलेलं लॉकडाउन अनेकजण गांभीर्याने घेत नाहीत असं दिसून येतं आहे. ही चिंतेची बाब आहे करोनाच्या संकटाशी लढा द्यायचा असेल तर लॉकडाउन गांभीर्यानं घ्या. घरी थांबा, स्वतःचा आणि कुटुंबीयांचा जीव धोक्यात घालू नका असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा केलं आहे. एक ट्विट करुन त्यांनी हे आवाहन केलं आहे. सरकारने दिलेल्या निर्देशांचे पालन करा असंही त्यांनी म्हटलं आहे. तसंच देशातल्या सगळ्या राज्य सरकारांनी नियम आणि कायदे पाळावेत असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.