बंगाल उपसागरावर नैऋत्य भागात कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून त्यामुळे येत्या चोवीस तासांत चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. सध्या कमी दाबाचा पट्टा आंध्र किनाऱ्याच्या दक्षिण-आग्नेयेला १७० कि.मी अंतरावर असून त्यामुळे चक्रीवादळाची शक्यता आहे.
काही हवामान प्रारूपानुसार हे वादळ किनारी भागातून ओडिशाकडे सरकण्याची शक्यता वर्तवली असून हे वादळ नंतर पश्चिम बंगालच्या दिशेने बांगलादेशकडे जाईल असे सांगण्यात आले. चक्रीवादळाचा फटका भारताच्या पूर्व द्वीपकल्प किनाऱ्याला बसणार नाही असा एक अंदाज देण्यात आला आहे.
पश्चिम बंगालच्या बाबतीत मात्र असे म्हणता येणार नाही. तेथील किनाऱ्याला बांगलादेशबरोबर फटका बसू शकतो. आठवडाअखेरीपर्यंत जरी वादळ आले तरी त्यामुळे उत्तर तामिळनाडू, आंध्र प्रदेश यांना फटका बसणार नाही पण समुद्र खवळलेला राहील, जोरदार पाऊस होईल असे हवामान विभागाने म्हटले आहे. दरम्यान तामिळनाडूत राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाने २५ बोटी सज्ज ठेवल्या आहेत.
तामिळनाडू, आंध्र प्रदेश व पश्चिम बंगालमध्ये जोरदार पाऊस झाल्याचे सांगण्यात आले. येत्या ४८ तासांत जोरदार वादळाची शक्यता या राज्यांमध्ये वर्तवण्यात आली आहे. भारतीय हवामान विभागाने सांगितले की, चेन्नईपासून ७० कि.मी अंतरावर बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून त्यामुळे ४८ तासांत चक्रीवादळ निर्माण होऊन ते आंध्र प्रदेशच्या दिशेने जाईल. तामिळनाडूत सोमवारी सुरू झालेला पाऊस बुधवारीही चालू होता. बंगालच्या उपसागरात नैऋत्येकडे कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून तो सहा तासात उत्तरेकडे सरकला व नंतर चेन्नईच्या पूर्वेला ९० कि.मी अंतरावर स्थिरावला होता. उत्तर किनारी तामिळनाडू व पुडुचेरीत २४ तासांत काही ठिकाणी मोठय़ा पावसाची शक्यता असून तामिळनाडूतील दक्षिण व किनारी भागात मोठय़ा पावसाची शक्यता असून उत्तर तामिळनाडू- पुडुचेरीत ताशी ५५ ते ७५ कि.मी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. येत्या ४८ तासांत दक्षिण आंध्र प्रदेशात वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. तामिळनाडू, पुडुचेरी व दक्षिण आंध्र प्रदेश, केरळचा किनारी भाग व लक्षद्वीप येथे मच्छिमारांनी सागरात जाऊ नये असा इशारा देण्यात आला आहे. आंध्र प्रदेशात जोरदार पावसाची शक्यता असून तेथेही मच्छिमारांना धोक्याचा इशारा दिला आहे.