कथित गोरक्षकांविरोधात कठोर कारवाई करण्याच्या सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्या आहेत. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला पंतप्रधान मोदींकडून गोरक्षणाच्या नावाखाली धुमाकूळ घालणाऱ्या स्वयंघोषित गोरक्षकांविरोधात कारवाई करण्याच्या सूचना केल्या आहेत. उद्यापासून संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे. या अधिवेशनात कथित गोरक्षकांनी देशभरात घातलेल्या हैदासावरुन विरोधकांकडून सरकारला धारेवर धरण्यात येणार आहे. त्यामुळेच कथित गोरक्षकांवर कारवाई करण्याच्या सूचना पंतप्रधान मोदींनी केल्या आहेत.

‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्यांना गोरक्षणाच्या नावाखाली कायदा हातात घेणाऱ्या गोरक्षकांविरोधात कठोर कारवाई करण्याच्या सूचना केल्या आहेत. कोणत्याही व्यक्तीला किंवा समुदायाला कायदा हातात घेण्याचा अधिकार नाही,’ असे केंद्रीय मंत्री अनंत कुमार यांनी म्हटले. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सर्वपक्षीय बैठक झाली. या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपचे वरिष्ठ नेते उपस्थित होते. या बैठकीनंतर केंद्रीय मंत्री अनंत कुमार यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

देशभरात गोमांस बाळगल्याच्या, गोहत्या केल्याच्या संशयावरुन जमावाकडून हिंसाचार करण्यात आल्याच्या घटना घडत आहेत. विशेष म्हणजे भाजपचे सरकार असलेल्या राज्यांमध्ये गोहत्या आणि गोमांसाच्या संशयावरुन सर्वाधिक हत्या झाल्या आहेत. ‘गाईंच्या संरक्षणासाठी देशभरात कायदा आहे. मात्र गाईंच्या संरक्षणासाठी कायदा हातात घेऊन हिंसाचार करणे सहन केले जाणार नाही,’ असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटल्याचे अनंत कुमार यांनी सांगितले.

‘काही राजकीय पक्षांकडून गोरक्षणाच्या मुद्याला धार्मिक स्वरुप दिले जाते आहे. राजकीय स्वार्थासाठी काही पक्षांकडून गोरक्षणाचा वापर केला जातो आहे. यामुळे देशाचा सलोखा बिघडतो आहे. गोरक्षणाच्या मुद्याला धार्मिक रंग दिला जाऊ नये. यामुळे देशाचे मोठे नुकसान होईल. गोरक्षणासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे,’ असे मोदी यांनी म्हटल्याची माहिती अनंत कुमार यांनी दिली.