अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार सुसान राईस यांनी दहशतवादाच्या मुद्दय़ावरून पाकिस्तानला कठोर शब्दांत सुनावले आहे. दहशतवादी छावण्यांबाबत कठोर भूमिका घ्या, असेही बजावले आहे. दहशतवादामुळे भारत
आणि अफगाणिस्तान या देशांसोबतचे पाकिस्तानचे संबंध ताणले जात असल्याचेही राईस यांनी म्हटले आहे.
सुसान राईस यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ, पाकिस्तानचे लष्करप्रमुख राहिल शरीफ आणि सरताज अझिझ यांची भेट घेत दहशतवाद्यांविरोधात कठोर भूमिका घेण्याची गरज असल्याचे स्पष्ट केले. दहशतवादी आणि इतर सशस्त्र बंडखोर गटांना पाकिस्तानी भूमीवरून हद्दपार केल्याशिवाय पाकिस्तानचे अफगाणिस्तान आणि भारताशी द्विपक्षीय संबंध सुधारणे कठीण असल्याचेही राईस यांनी स्पष्ट केल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली.
पाकिस्तानमधून दहशतवाद समूळ नष्ट करणे याच मुद्दय़ावर पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्यात चर्चा होणार आहे. शरीफ २२ ऑक्टोबर रोजी अमेरिकेत ओबामा यांची भेट घेणार आहेत. पाकिस्तानच्या भूमीवर दहशतवादी आणि बंडखोरांची प्रशिक्षण केंद्रे चालविण्यात येतात. त्यामुळे शेजारी देश पाकिस्तानवर विश्वास ठेवू शकत नाहीत. तसेच, पाकिस्तानमध्ये सातत्याने दहशतवादी हल्ले होत असून त्यात निरपराधांचा बळी जात आहे. त्यामुळे पाकिस्तानने दहशतवाद्यांबाबत कठोर निर्णय घ्यावेत, असेही राईस यांनी पाकिस्तानी नेतृत्वाला सुनावले.
राईस यांनी इस्लामाबाद दौऱ्यात दहशतवादाबरोबरच हवामान बदल, अर्थव्यवस्था, महिला शिक्षण आणि अणुप्रसार विरोधी करार या मुद्दय़ांवरही सविस्तर चर्चा केली. तसेच, भारत-पाकिस्तान संबंधांवर चर्चेतूनच मार्ग निघेल, असा पुनरुच्चारही त्यांनी केला.