अमेरिकेतील भारताच्या उपमहावाणिज्य दूत देवयानी खोब्रागडे यांना अटक केल्याचा मुद्दा बुधवारी संसदेमध्ये विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी उपस्थित करून सरकारकडे अमेरिकेविरोधात आणखी कडक पावले उचलण्याची मागणी केली. सरकारने अमेरिकेला जशास तसे उत्तर द्यावे, अशी मागणी समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा मुलायमसिंह यादव यांनी लोकसभेत केली.
देवयांनी खोब्रागडे यांना सार्वजनिक ठिकाणी बेड्या घालून अटक करणे, त्याची कपडे उतरवून तपासणी करणे हा अतिशय गंभीर विषय आहे. त्यामुळे अमेरिकेच्या तोऱयाला न घाबरता सरकारने जशास तसे उत्तर द्यावे. अमेरिकेच्या या कारवाईविरोधात संसदेने निषेध प्रस्ताव मांडावा, अशी मागणी मुलायमसिंह यांनी केली.
खोब्रागडे अटकप्रकरणी केंद्र सरकार आक्रमक
लोकसभेच्या विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज यांनी मुलायमसिंह यांच्या मागणीला पाठिंबा दिला. देवयानी खोब्रागडे आपल्या मुलाला शाळेत सोडायला जात असताना, त्यांना रस्त्यात अटक करण्यात आली. हा निंदनीय प्रकार असल्याचे त्या म्हणाल्या.
दरम्यान, राज्यसभेमध्ये हा विषय उपस्थित करताना बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती यांनी केंद्र सरकारवर टीका केली. देवयानी खोब्रागडे या दलित वर्गातील असल्यामुळेच सरकार कारवाई करण्यात दिरंगाई करीत असल्याचा आरोप त्यांनी केला.