मोबाइल अॅप्लिकेशनच्या माध्यमातून मागवलेल्या अन्नपदार्थांमध्ये किटक सापडल्याच्या बातम्या अनेकदा वाचनात येतात. मात्र चीनमध्ये एका महिलेने ऑनलाइन अॅप्लिकेशनच्या माध्यमातून ऑर्डर केलेल्या अन्नपदार्थामध्ये एक दोन नाही तर चक्क ४० मेलेली झुरळं सापडली आहेत. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार या महिलेने मांसाहारी जेवण आपल्या मित्रमैत्रीणींसाठी मागवले होते. या महिलेच्या पाहुण्यांनी जेव्हा पार्सल आलेले हे खाण्याचे डब्बे उघडले तेव्हा त्यांना त्यामध्ये मेलेली झुरळं अढळली. या महिलेने लगेच या प्रकाराचा व्हिडीओ शूट करुन फेसबुकवर पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ आता फेसबुकबरोबरच ट्विटर आणि युट्यूबबरोबरच इतर सोशल नेटवर्कींग साइट्सवरही व्हायरल झाला आहे.

या महिलेने एका स्थानिक न्यूज वेबसाईटला दिलेल्या माहितीनुसार, तिच्या मित्राने पार्सल आलेल्या अन्नपदार्थांचा डबा उघडल्यानंतर त्याला एक मेलेले झुरळ अढळले. त्यानंतर तीने पार्सल आलेल्या अन्नपदार्थांची सर्व पाकिटे उघडली तेव्हा तिला धक्काच बसला. या पाकिटांमध्ये तिला चक्क ४० मेलेली झुरळं सापडली. तिने पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये तिचे मित्र आणि ती या खाण्याच्या पदार्थांमधून झुरळं बाहेर काढताना दिसत आहेत.

संबंधित प्रकाराबद्दल हॉटेलला तसेच स्थानिक पोलीस खात्याला माहिती देण्यात आली आहे. पोलिसांनी तपास पूर्ण होईपर्यंत या हॉटेलचा परवाना १५ दिवसांसाठी रद्द केला आहे. मोबाइल अॅप्लिकेशनच्या माध्यामातून घरपोच डिलेव्हरी देणाऱ्या हॉटेलमधील अन्नपादर्थांच्या दर्जासंदर्भात तपास करण्यास पोलिसांनी सुरुवात केली आहे. अन्नपदार्थांच्या दर्जाशी तडजोड करुन ग्राहकांच्या जीवाशी खेळणाऱ्या हॉटेल्सवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.