राहुल गांधींची टीका; शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मागणी

काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आपल्या उत्तर प्रदेशच्या दौऱ्यात बुधवारी सलग दुसऱ्या दिवशी शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याच्या मागणीचा पाठपुरावा केला. जनतेला हालअपेष्टा सोसाव्या लागत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी मजेत बसून आहेत, असा आरोप करून गांधी यांनी मोदी यांच्या परदेश दौऱ्यांवरही टीका केली. मोदी हे भारताचे पंतप्रधान असल्याने त्यांनी भारतीयांकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे, असेही गांधी म्हणाले. मोदी यांनी गरिबांसाठी सरकार चालवावे आणि शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील अश्रू पुसावे, असे आवाहन या वेळी गांधी यांनी केले. जनता त्रस्त आहे आणि मोदी मस्त आहेत, असेही ते म्हणाले.

मोदी यांच्या परदेश दौऱ्यांवर टीका करताना गांधी म्हणाले की, मोदी इंग्लंडला जातात, काही वेळा चीन. जपानला जातात, काही वेळा ओबामा यांना भेटण्यासाठी जातात. ते भारताचे पंतप्रधान आहेत, अमेरिकेचे नव्हे याचे त्यांना स्मरण करून द्यावयाचे आहे, त्यामुळे त्यांनी शेतकऱ्यांवर लक्ष केंद्रित करावे, असे ते म्हणाले.

मोदी यांनी गेल्या दोन वर्षांत बडे उद्योगपती आणि धनिकांचे जवळपास १.१० लाख कोटी रुपयांचे कर्ज माफ केले, याकडे राहुल यांनी लक्ष वेधले.

  • अनेक बँकांचे कोटय़वधी रुपयांचे कर्ज बुडवून पसार होणारे मद्यसम्राट विजय मल्या यांना कर्जबुडवे संबोधले जाते आणि खाट सभेनंतर खाटा घेऊन जाणाऱ्या शेतकऱ्यांना मात्र चोर संबोधले जाते, असे नमूद करून राहुल गांधी यांनी, खाटांसह पसार होणाऱ्या शेतकऱ्यांच्या बचावाचा प्रयत्न केला.