अफगाणिस्तानातील अत्यंत सुरक्षित ठिकाण मानल्या जाणाऱ्या अध्यक्षीय राजप्रासादावर मंगळवारी तालिबानच्या आत्मघाती दहशतवाद्यांनी हल्ला केला. त्यांनी तेथे कारबॉम्ब लावला होता. सुरक्षा दलांनी या दहशतवाद्यांशी खंबीरपणे मुकाबला करीत सर्व हल्लेखोरांना ठार केले, यात सुरक्षा दलाचा एक जवान जखमी झाला, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. तालिबानने या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे.
दरम्यान दक्षिण अफगाणिस्तानात एक मिनी बस रस्त्यावर ठेवलेल्या बॉम्बवर जाऊन आदळली. त्यात एकाच कुटुंबातील अकरा जण ठार झाले असे कंदाहारच्या गव्हर्नरांचे प्रवक्ते अहमद जावेद फैजल यांनी सांगितले. या स्फोटात आठ महिला, दोन मुले, एक पुरुष ठार झाले तर दोन पुरुष जखमी झाले. तालिबानने अध्यक्षीय राजप्रासादातील  हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. एका अफगाण युवकाच्या कार्यक्रमात अध्यक्ष हमीद करझाई हे दहशतवादी गटांशी चर्चेच्या प्रक्रियेबाबत माहिती देण्यासाठी येणार होते त्याचे वार्ताकन करण्यासाठी वार्ताहर जमत असताना हा हल्ला झाला. अध्यक्षीय राजप्रासाद हा मोठी तटबंदी असलेला भाग असून तेथे अमेरिकी दूतावास व नाटो-मित्र देशांच्या सैन्याचे मुख्यालय आहे. तेथे प्रवेश करणे खूपच मुश्कील आहे. तेथे अध्यक्ष करझाई यांचे निवासस्थानही आहे पण त्या वेळी ते तिथे होते किंवा नाही हे समजू शकले नाही.
स्थानिक वेळेनुसार सकाळी साडेसहा वाजता पूर्वेकडील प्रवेशद्वाराच्या बाजूने गोळीबार सुरू झाला. हे प्रवेशद्वार अमेरिकेच्या सीआयए या गुप्तचर संस्थेकडून वापरले जात असल्याचे अमेरिकेच्या माजी गुप्तचर अधिकाऱ्यांनी सांगितले.
काबूलचे पोलीस प्रमुख जनरल महंमद अयुब सलांगी यांनी सांगितले की, तीन ते चार बंदूकधारी त्यांच्या स्पोर्ट्स युटिलिटी व्हेईकलमधून उडय़ा मारून बाहेर आले व सुरक्षा दलांनी त्यांना अडवताच त्यांनी गोळीबार सुरू केला. या वेळी धुमश्चक्रीत सर्व बंदूकधारी हल्लेखोर ठार झाले तर एक सुरक्षा रक्षक जखमी झाला. एक मोटार राजप्रासादाच्या परिसराकडे येत असताना स्फोट झाला त्या वेळी वीस पत्रकारांनी एका धर्मस्थळामागे आश्रय घेतला .
तालिबानचा प्रवक्ता झबिउल्ला मुजाहिद याने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारताना म्हटले आहे की, आम्ही आत्मघाती हल्ला करून शत्रूला मारले आहे. सर्व तीनही इमारतींना हल्ल्यात लक्ष्य केले होते. सीआयएचा तळ असलेल्या एरियाना हॉटलजवळ, अध्यक्षीय राजप्रासादात तसेच संरक्षण मंत्रालयावर आम्ही हल्ला केला.