अफगाणिस्तानात एका लेबनित्झ रेस्टॉरंटमध्ये आत्मघाती हल्लेखोराने केलेल्या बॉम्बस्फोटात २१ जण ठार झाले असून हे रेस्टॉरंट काबूलमधील परदेशी नागरिकांमध्ये फार लोकप्रिय आहे. या हल्ल्यात काही परदेशी व्यक्ती व दोन बंदूकधारी जवानही ठार झाले. त्यात इतर चारजण जखमी झाले आहेत. दरम्यान तालिबानने या हल्ल्याची जबाबदारी घेतली असून परदेशी व सरकारी हितसंबंध जपणाऱ्या संस्थांविरुद्ध हल्ले करण्याचा तालिबानचा हेतू आहे. वर्षअखेरीस अमेरिकी सैन्य येथून जाणार असले तरी आम्ही कुठेच जाणार नाही येथेच राहणार आहोत अशी दर्पोक्तीही तालिबानने केली आहे. अनेक दूतावासांच्या जवळ असलेल्या या रेस्टॉरंटमध्ये हा आत्मघाती हल्लेखोर आला व त्याने स्वत:ला डिटोनेटरने उडवले, सुरक्षा रक्षकांनी इतर दोन हल्लेखोरांना ठार केले, हा हल्ला  तासभर सुरू होता.
काबूलचे पोलीस प्रमुख जनरल महंमद जहीर यांनी सांगितले की, रेस्टॉरंटमधील २१ जण त्यात मारले गेले.  मध्य वझीर अकबर खान या भागात हे रेस्टॉरंट असून परदेशी व अफगाणी नागरिक यात ठार झाले. या रेस्टॉरंटमध्ये नेहमी परदेशी राजनीतीज्ञ, मदतकार्य करणारे कार्यकर्ते, पत्रकार व उद्योजक यांची नेहमी वर्दळ असते. या रेस्टॉरंटचे छत कमी उंचीचे असून त्याला फारशा खिडक्या नाहीत त्यामुळे ते सुरक्षित मानले जात होते. तेथे काही स्टील एअरलॉक सुरक्षेसाठी लावलेली होती. प्रवेश करताना पोलीस हल्लेखोरांची तपासणी करीत असत. या हल्ल्यात इतर चारजण जखमी झाले असून पत्रकारांना या ठिकाणी येण्यास मज्जाव करण्यात आला. अंतर्गत सुरक्षा मंत्री शेदिक शेदिकी यांनी सांगितले की, सुरक्षा जवानांनी दोन हल्लेखोरांना ठार केले. या हल्ल्यात शक्तिशाली स्फोटके वापरल्याने जास्त प्रमाणात प्राणहानी झाली.
तालिबानचा प्रवक्ता झबीउल्ला मुजाहिद याने असा दावा केला की, परदेशी अधिकाऱ्यांना लक्ष्य करण्याचा आमचा हेतू होता. विशेष करून जर्मनीच्या उच्चाधिकाऱ्यांना आम्हाला मारायचे होते.