१७० जण ओलिस

उत्तर अफगाणिस्तानात तालिबानने केलेल्या हल्ल्यात १६ बस प्रवासी ठार झाले असून, अनेक जण जखमी झाले आहेत. आताच्या या हल्ल्यात काही प्रवाशांना बसमधून ओढून काढण्यात आले होते. नवीन नेत्याची घोषणा करण्यात आल्यानंतर अफगाणिस्तानात हल्ले तीव्र करण्यात आले आहेत. शिया हाजरा या अल्पसंख्याकांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न तालिबानने ९०च्या दशकानंतर परत सुरू केला असून, त्यात त्यांच्यावर हल्ले केले जात आहेत. अद्याप आताच्या हल्ल्याची जबाबदारी कुणी घेतलेली नाही. कुंडुझ प्रांत गेल्या वर्षी काही काळ तालिबानच्या ताब्यात होता. तालिबानने कुंडुझ प्रांतातील अलियाबाद जिल्हय़ात झालेल्या हल्ल्यानंतर कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही. तालिबानने सोळा प्रवाशांना गोळय़ा घालून ठार केले तर इतर तीस जणांना ओलिस ठेवले आहे, असे  कुंडुझ प्रांतातील गव्हर्नरांचे प्रवक्ते सय्यद महमूद दानिश यांनी सांगितले.

पोलीस कमांडर शिर अजिज कमावल यांनी मृतांचा आकडा १७ सांगितला आहे. सुमारे दोनशे प्रवासी बसने प्रवास करीत असताना त्यांच्या बस तालिबानने अडवल्या. त्यांनी काही प्रवाशांना सोडून दिले असून अनेकांना ओलिस ठेवले आहे. प्रवाशांमधील कुणीही लष्करी गणवेश घातलेला नव्हता, पण त्यात काही माजी पोलीस असण्याची शक्यता आहे. अलियाबाद येथील रहिवाशांनी सांगितले, की तालिबानने प्रवाशांची अनौपचारिक न्यायालयात मशिदीत सुनावणी सुरू केली आहे. त्यात प्रवाशांची ओळखपत्रे तपासून  जाबजबाब घेतले जात आहेत. त्यांचा सरकारशी काही संबंध आहे का याचा तपास केला जात आहे. येथील  महामार्ग हे तालिबानच्या क्षेत्रातून जातात, त्यामुळे तेथून प्रवास करणे जोखमीचे असते. सशस्त्र गट नेहमी प्रवाशांचे अपहरण करीत असतात. नागरिक नेहमीच या संघर्षांचे बळी ठरत आले आहेत. तालिबानने उन्हाळी हल्ले तीव्र केले असून, गेल्या महिन्यातही हल्ले केले होते. अफगाणिस्तान तालिबानने हैबतुल्ला अखुंडजादा या नव्या नेत्याची निवड केली आहे. तो फार आक्रमक नसला व धार्मिक पाश्र्वभूमीचा असला तरी शांतता चर्चेस तो प्रतिसाद देईल असे नाही. अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात मुल्ला मन्सूर मारला गेल्यानंतर अखुंडजादा याची नेतेपदी निवड करण्यात आली होती. मुल्ला ओमरचा मृत्यू झाल्याचे निश्चित झाल्यानंतर मन्सूर याची निवड झाली व त्यानंतर अवघ्या नऊ महिन्यांनी तो मारला गेला. मन्सूर याने शांतता चर्चेत खोडा घातला होता, त्यामुळे त्याला अमेरिकेने पाकिस्तानी हद्दीत घुसून ड्रोन हल्ले करीत ठार केले होते. तालिबानने दोन दिवसांत केलेल्या हल्ल्यात पन्नास अफगाणी पोलिसांना हेल्मंड प्रांतात ठार केले आहे. सोमवारी २४, रविवारी ३३ जणांना ठार मारण्यात आल्याचे पोलीस कमांडर इस्मतउल्ल दौलतझाई यांनी सांगितले.