पोलिसांच्या गणवेशात आलेल्या तालिबानी बंडखोरांनी अफगाणिस्तानातील तपासणी नाक्यांवर केलेल्या हल्ल्यात किमान नऊ अधिकारी ठार झाले.
दोनपैकी सगळ्यात घातक हल्ल्यात बंडखोरांनी तालिबान्यांचे शक्तिस्थान असलेल्या दक्षिण कंदाहार प्रांतातील तपासणी नाक्याला लक्ष्य केले. मैवांद जिल्ह्य़ातील हा नाका उद्ध्वस्त करून बंदूकधाऱ्यांनी किमान ५ अधिकाऱ्यांना ठार मारले. हल्लेखोरांपैकी एक-दोघांनी पोलिसांचा गणवेश घातला होता, अशा माहितीवरून पोलिसांनी तपास सुरू केला आहे, असे पोलिसांचे प्रवक्ते झिया दुरानी यांनी सांगितले.
दक्षिण हेरात प्रांताच्या चश्ती शरीफ जिल्ह्य़ातील तपासणी नाक्यावरील दुसऱ्या हल्ल्यात तालिबान्यांनी ४ पोलीस अधिकाऱ्यांना ठार मारले. हल्ल्यानंतर या नाक्याचा प्रभारी अधिकारी बेपत्ता झाल्याने, हल्ल्यासाठी मदत केल्यानंतर तो तालिबानींसोबत पळून गेल्याचा संशय घेण्यास जागा आहे, असे जिल्हा पोलीसप्रमुख गुलाम रसूल यांनी सांगितले.