पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पुन्हा एकदा तालिबानचे उघडपणे समर्थन केलं आहे. इम्रान खान यांनी तालिबानी दहशतवादी हे सामान्य नागरिक असल्याचे म्हटले आहे. पंतप्रधान म्हणाले की अमेरिकेने अफगाणिस्तानात जाऊन सर्व परिस्थिती बिघडवली. एका अहवालात दावा केला गेला आहे की तालिबानच्या मदतीसाठी सुमारे १०,००० पाकिस्तानी सैनिकांनी सीमा ओलांडली आहे असा प्रश्न इम्रान खान यांना विचारण्यात आला होता. यावर इम्रान खान चिडले आणि म्हणाले की हे अगदी चुकीचे आहे, ते याचा पुरावा आम्हाला का देत नाही? अफगाणिस्तानाच्या समस्येवर युद्धातून शक्य नाही तर राजकीय तोडग्यातून मार्ग निघू शकतो.

अफगाणिस्तानात तालिबान या दहशतवादी संघटनेचा प्रभाव वाढत आहे. अफगाणिस्तानातील परिस्थिती दिवसेंदिवस वाईट होत चालली आहे. दरम्यान, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी अफगाणिस्तानच्या सद्याच्या परिस्थितीसाठी अमेरिकेला दोषी ठरवले आहे. “अमेरिकेने तालिबान्यांना योग्यप्रकारे हाताळले नाही. तालिबानी हे सामान्य नागरिक आहेत, ते कोणत्याही लष्करी पोशाखात नाहीत. अमेरिकेला हे समजले नाही. अमेरिकेने तिथे सर्व काही बिघडवले,” असे इम्रान खान यांनी म्हटले आहे.

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी अमेरिकन वृत्तवाहिनी पीबीएसचे पत्रकार ज्युडी वुड्रफ यांना दिलेल्या मुलाखतीत या हे वक्तव्य केलं. इम्रान खान म्हणाले, ‘अफगाणिस्तानाची समस्या युद्धातून सुटू शकत नाही. मी हे सुरुवातीपासूनच सांगत आलो आहे, पण माझे ऐकले नाही. उलट मला तालिबान खान आणि अमेरिकी विरोधी म्हणून असल्याचे दाखवण्यात आले.”

अमेरिकेकडून झाल्या चुका

इम्रान खान म्हणाले, ‘अफगाणिस्तानाच्या समस्येवर लष्करी तोडगा निघू शकत नाही हे जेव्हा अमेरिकेला समजले, तेव्हापर्यंत बराच उशीर झाला होता. एकेकाळी अफगाणिस्तानात अमेरिकेचे १०,००० हून अधिक सैनिक होते. खर्‍या अर्थाने ही वेळ होती जेव्हा अमेरिकेने तालिबानांशी करार केला पाहिजे. अफगाणिस्तानच्या भवितव्यासाठी राजकीय तोडग्यातून मार्ग निघू शकतो. हा एकमेव मार्ग आहे आणि सत्य हे आहे की आता अफगाणिस्तान सरकारमध्ये तालिबानचा सहभाग असेल.

तालिबान्यांना मदत केल्याचा आरोप चुकीचा

तालिबान्यांना पाकिस्तानकडून निधी मिळत असल्याचा आरोप इम्रान खान यांनी फेटाळून लावला. “हा पूर्णपणे खोटा आरोप आहे. जेव्हा अल कायदाने वर्ल्ड ट्रेड सेंटरवर हल्ला केला तेव्हा एकाही पाकिस्तानी नागरिक यात सामील नव्हता. त्यावेळी कोणताही तालिबानी सैनिक पाकिस्तानात नव्हता. अमेरिका आणि तालिबान यांच्यात झालेल्या चकमकीत ७०  हजाराहून अधिक पाकिस्तानी नागरिक मरण पावले आहेत. अफगाणिस्तानात सुरू असलेल्या युद्धामुळे पाकिस्तानला १५० अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले आहे,” असे इम्रान खान म्हणाले.

पाकिस्तानवरही युद्धाचा परिणाम

“जर अफगाणिस्तान गृहयुद्धेकडे वळला तर त्याचा परिणाम पाकिस्तानवरही होईल. निर्वासिताची समस्या आपल्या देशासमोर निर्माण होईल. पाकिस्तानमध्ये आधीच ३ दशलक्षाहून अधिक अफगाण शरणार्थी आहेत. त्यांची संख्या वाढल्यास आपण अडचणीत येऊ, आपल्या देशाची आर्थिक स्थिती अशी नाही की निर्वासितांना समस्येचा सामना करावा करु शकतो,” असे पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणाले.