प्रवेशद्वाराजवळ कारबॉम्बचा स्फोट ल्ल चार पोलीस ठार
पूर्वेकडील गझनी शहरात तालिबानी बंडखोरांनी लष्कराच्या वेशात येऊन तुरुंगावर हल्ला करून शेकडो कैद्यांना मुक्त केले, त्यात चार पोलीस ठार झाले. यावेळी कारबॉम्बचा स्फोट करण्यात आला. अफगाणिस्तानात जुलैमध्ये तालिबानचा मुल्ला अख्तर मनसौर याला नव्याने प्रमुख म्हणून नेमण्यात आले आहे. त्यानंतर हल्ले वाढले आहेत. यापूर्वी २०११ मध्ये झालेल्या हल्ल्यात दक्षिणेकडील कंदाहार येथे ५०० तालिबानी कैद्यांना मुक्त करण्यात आले होते.
आताच्या हल्ल्यानंतर तुरुंगाच्या प्रवेशद्वाराजवळ गोळ्यांनी चाळण झालेले मृतदेह दिसत होते तर अफगाणी दलांनी नाटोच्या पाठिंब्याशिवाय प्रथमच मोठय़ा हल्ल्याला तोंड दिले. पहाटे अडीच वाजता सहा तालिबानी अतिरेकी लष्करी वेशात आले व त्यांनी गझनीच्या तुरुंगावर हल्ला केला. प्रथम त्यांनी प्रवेशद्वाराजवळ कारबॉम्बचा स्फोट केला व रॉकेटच्या मदतीने बॉम्ब टाकले, असे प्रांताचे उपगव्हर्नर महंमद अली अहमदी यांनी सांगितले.
तुरुंगात ४३६ कैदी
अंतर्गत सुरक्षा मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार तुरुंगात ४३६ कैदी होते त्यापैकी ३५५ जणांची तालिबानने मुक्तता केली. देशाची सुरक्षा व इतर गुन्ह्य़ांशी संबंधित आरोप असलेले हे कैदी होते.
तालिबानने या हल्ल्याची जबाबदारी घेतली असून पहाटे दोन वाजता केलेल्या कारवाईत तुरुंगाचा ताबा घेण्यात आल्याचे प्रवक्ता झबिउल्ला मुजाहिद याने म्हटले आहे.आमच्या देशातील चारशे निरपराध लोकांना आम्ही मुक्त केले आहे. त्यांना मुजाहिद्दीन नियंत्रित भागात नेण्यात आले आहे.
तालिबान नेहमी त्यांचे विधाने विपर्यास करून सांगत असते त्यामुळे त्यांच्या म्हणण्यात अतिशयोक्ती असू शकते. २०११ मध्ये त्यांनी ५०० तालिबानी योद्धय़ांना तुरुंगातून मुक्त केले होते त्यात काही कमांडर्सचाही समावेश होता. कंदाहार प्रांतात हा तुरूंग फोडण्यात आला होता.