काबूल शहराच्या बाहेरील भागात तालिबानी अतिरेक्यांनी हल्ला करून इंधनाचे २०० ट्रक पेटवून दिले. या ट्रकमधून परकीय सैनिकांना इंधन पुरविले जात असल्याच्या संशयावरून अतिरेक्यांनी हे कृत्य केल्याची माहिती अफगाणिस्तानच्या अधिकाऱ्यांनी दिली. चौक-ए-अरघंडी या भागात ही घटना घडल्यानंतर तेथे कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला.
हे ट्रक काबूलमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत असताना पार्किंगमध्ये उभे करून ठेवण्यात आले होते. शुक्रवारी रात्री साधारण साडेदहाच्या सुमारास प्रारंभी खासगी मालकीच्या डझनभर टँकरना आग लावण्यात आली. या आगीची तीव्रता प्रचंड असल्यामुळे कोणीही तेथे जाण्यास धजावले नाही. मात्र त्यामध्ये कोणाला इजा झाली नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. इंधनाच्या ट्रकना आग लावण्यासाठी चुंबकीय बॉम्बचा वापर करण्यात आला. या ट्रकमधील इंधन परदेशी सैनिकांसाठी नेण्यात येत होते काय, यासंबंधी तपास करण्यात येणार आहे. प्रारंभीच्या तपासाअंती २०० ट्रकची हानी झाल्याचे अफगाणिस्तानच्या गृहमंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.