अफगाणिस्तानमधून अमेरिकन सैन्याने माघार घेतल्यानंतर देश तालिबानच्या ताब्यात गेलाय. जेव्हापासून तालिबाने अफगाणिस्तानवर ताबा मिळवलाय तेव्हापासून देशामधील वेगवेगळ्या तुरुंगामध्ये कैद असणाऱ्या दहशतवाद्यांना मुक्त करण्याचा सपाटाच या दहशतवादी संघटनेनं सुरु केला आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अफगाणिस्तानच्या तुरुंगामध्ये कैद असणाऱ्या आयएसकेपीचा दहशतवाही एजाज अहंगरलाही तालिबान्यांनी तुरुंगातून मुक्त केलं आहे. ही बातमी भारताची चिंता वाढवणारी आहे.

तुरुंगामधून सुटलेला एजाज हा जम्मू काश्मीरमध्ये भारतीय संरक्षण यंत्रणांविरोधात कारवाया करण्यासाठी ओळखला जातो. त्याचा अनेक दहशतवादी कारवायांमध्ये समावेश असल्याची माहिती समोर आलीय. हा दहशतवादी मूळचा पाकव्याप्त काश्मीरमधील आहे. मात्र त्याने अनेकदा भारतामध्ये घुसखोरी करुन जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ले घडवून आणल्याचं सांगितलं जातं. त्याचा अनेक दहशतवादी हल्ल्यांमध्ये सहभाग असल्याचे पुरावे संरक्षण यंत्रणांकडे आहेत.

जम्मू काश्मीरमध्ये तालिबानचा डाव… 

आयएसकेपीचा माजी प्रमुख हुजैफा पाकिस्तानमधील ड्रोन हल्ल्यांमध्ये ठार झाल्यानंतर आयएसकेपीचं नेतृत्व आणि भारताविरोधात दहशतवादी कारवाया घडवण्याचं खास करुन जम्मू काश्मीरमध्ये काम असलम फारुखीने केलं. असलमलाही तालिबान्यांनी अफगाणिस्तानच्या तुरुंगामधून मुक्त केलंय. तालिबानने आता आयएसकेपीचा दहशतवादी एजाज अहंगरलाही पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआयच्या इशाऱ्यावर मुक्त केल्याचं सांगितलं जातं. तालिबान आणि पाकिस्तानमधील आयएसआयची जवळीक वाढली असून भारतासाठी हा धोक्याचा इशारा असल्याचं सांगितलं जात आहे. न्यूज १८ ने सुत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार जम्मू काश्मीरमध्ये आपली दहशत पसरवण्याचा तालिबानचा इरादा होता.

पाक घेतंय तालिबानची मदत…

तालिबानच्या मदतीसाठी पाकिस्तान सरकार आणि त्याच्या गुप्तचर यंत्रणाने एक प्लॅन तयार केलाय. भारत आता तालिबानवर लक्ष ठेऊन आहे. भारताने तालिबान्यांकडून पाकिस्तानच्या मदतीने सुरु केलेल्या कारवायांची माहिती घेण्यास सुरुवात केली असून तालिबान्यांचा सामना करण्यासाठी संरक्षण दलातील जवानांना विशेष प्रशिक्षणही देण्यात आलं आहे.

पाकिस्तानचा कट…

पाकिस्तानने आता इस्लामिक स्टेट फॉर खुरासान प्रोव्हिन्स म्हणजेच आयएसकेपीच्या नावाखाली भारतात दहशतवादी कारवाया घडवून आणण्याचा कट रचला आहे. पाकिस्तानने याच कामासाठी तालिबान्यांच्या मदतीने आयएसकेपीचा सध्याचा प्रमुख असलम फारुखीला अफगाणिस्तानमधील बगराल तुरुंगातून सोडवलं आहे. फारुखीचे लष्कर ए तोयबासोबतही चांगले संबंध असल्याने भारताची त्याच्या हलचालींवर बारीक नजर आहे.

कशी झाली होती एजाजला अटक

एजाजचं नाव सर्वात आधी २०२० साली समोर आलं जेव्हा अफगाणिस्तानमधील गुप्तचर यंत्रणांनी काबुलमधील गुरुद्वारामध्ये २५ मार्च २०२० रोजी झालेल्या बॉम्बस्फोटाचा तपास सुरु केला. इस्लामिक स्टेट फॉर खुरासान प्रोव्हिन्सने हा स्फोट घडवून आणल्याचं सांगण्यात आलेलं. या हल्यामध्ये २० शीख भविकांचा मृत्यू झाला होता. अफगाणिस्तान आणि अमेरिकन गुप्तचर यंत्रणांनी या प्रकरणामध्ये एप्रिल २०२० मध्ये कंदहारमध्ये तीन जणांना अट केली यात आएसपीकेचा प्रमुख असलम फारुखी मौलवी अब्दुल्ला, अली मोहम्मद आणि त्नवीर अहमदचा समावेश होता. फारुखी आपण पाकिस्तानचे तर तन्वीरने बांगलादेशचे नागरिक असल्याचं सांगितलं. मात्र अली मोहम्मद ही तिसरी व्यक्ती पाकिस्तानमधील होती. असं असलं तरी पाकिस्तानने यासंदर्भात कोणतीही माहिती दिली नाही. अखेर अली मोहम्मद हाच एजाज असल्याची माहिती समोर आली. मागील २५ वर्षांपासून भारतीय गुप्तचर यंत्रणांना चकवा देणाऱ्या एजाजला झालेली अटक ही भारताच्या दृष्टीने महत्वाची होती. मात्र आता त्याला मुक्त करण्यात आल्याने भारताची चिंता वाढलीय.