तालिबानी दहशतवाद्यांनी अफगाणिस्तानमधील उत्तर भागातून १०० हून अधिक लोकांना ओलिस ठेवले आहे. यामध्ये लहान मुलं आणि महिलांचाही समावेश आहे. ईद-उल-अजहाच्या काही दिवस आधी राष्ट्राध्यक्ष अश्रफ गनी यांनी शस्त्रसंधीचे आवाहन केले होते. तरीही तालिबानने लोकांना ओलिस ठेवले आहे.

सोमवारी दहशतवाद्यांनी तीन बस रोखल्या आणि त्यातील प्रवाशांना ओलिस ठेवले, अशी माहिती कुंदूज प्रांताचे प्रमुख मोहम्मद युसूफ अयुबी यांनी दिली. ही घटना खान आबाद जिल्ह्यात घडली. दहशतवादी झाडांमध्ये दबा धरून बसले होते. संधी मिळताच त्यांनी बसवर हल्ला केला. सरकारी कर्मचारी किंवा सुरक्षा रक्षकांना बंधक बनवण्याचा तालिबानी दहशतवाद्यांचा डाव होता, असेही अयुबी यांनी म्हटले.

ताखार प्रांताचे पोलीस प्रमुख अब्दुल रहमान अकताश म्हणाले की, हे प्रवासी बदखशान आणि ताखर प्रांतातील होते. हे सर्वजण काबूलला जात होते. दरम्यान तालिबानने या घटनेची जबाबदारी अद्याप घेतलेली नाही. परंतु, वृत्त संस्थांनुसार या घटनेमागे तालिबानचाच हात असल्याचे सांगण्यात येते. ही घटना जिथे घडली, तो तालिबानचे नियंत्रण असलेला भाग आहे.