अफगाणिस्तानातून नाटो सैन्य माघारी जाण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होत असतानाच तालिबान्यांनी अफगाणी सुरक्षा व्यवस्थेलाच लक्ष्य करण्याचे सत्र अवलंबले आहे. अफगाणी गुप्तचर संस्थेच्या मुख्यालयावरच तालिबान्यांनी बुधवारी आत्मघाती हल्ला चढवला. या धुमश्चक्रीत दोन सुरक्षारक्षक ठार झाले तर २० नागरिक जखमी झाले.
राजधानी काबूलच्या अत्यंत सुरक्षित अशा परिसरात नॅशनल डायरेक्टोरेट ऑफ सेक्युरिटी (एनडीएस) या अफगाणी गुप्तचर संस्थेचे मुख्यालय आहे. याच मुख्यालयावर बुधवारी तालिबान्यांनी आत्मघातकी हल्ला चढवला. स्फोटकांनी भरलेल्या कारमधून पाच तालिबान्यांनी हा हल्ला केला. कार मुख्यालयाच्या दरवाजाशी धडकावली. या धडाक्याचे पडसाद संपूण राजधानीत घुमले. स्फोटात दोन सुरक्षारक्षक ठार झाले तर २० नागरिक जखमी झाले. स्फोटाच्या ठिकाणापासून चिकन मार्केट हा बाजार परिसर असून पाश्चिमात्यांचा या ठिकाणी मोठय़ा प्रमाणात वावर असतो. परंतु जखमींमध्ये अफगाणी नागरिकांचाच सर्वाधिक भरणा आहे. हल्ल्यानंतर लगेचच तालिबानने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. तसेच असे हल्ले आणखीही होतील असा गर्भित इशाराही दिला.
दरम्यान, अफगाणिस्तानचे गृहमंत्री सादिक सिद्दिकी यांनी या हल्ल्यात पाचही तालिबानी ठार झाले असून स्फोटकांनी भरलेली एक कारही जप्त करण्यात आल्याचे स्पष्ट केले. कडेकोट सुरक्षाव्यवस्था असतानाही हा हल्ला होणे हे चिंतनीय असल्याचे ते म्हणाले.