मैदानावर प्रतिस्पर्धी संघावर दहशतीचे दडपण कायम ठेवणाऱ्या सचिन तेंडुलकर या क्रिकेटवीराच्या प्रसिद्धीची भीती पाकिस्तानी वाळवंटी मैदानात दहशत पेरणाऱ्या तालिबान्यांवरही सारखीच असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. सचिनच्या निवृत्तीनंतर पाकिस्तानी माध्यमांनी ही त्याचा ‘अलविदा’ महोत्सव सुरूच ठेवला आहे. तेव्हा सचिन तेंडुलकर याचे कौतुकपुराण थांबविण्याचे आवाहन तेहरिक-ए-तालिबान या संघटनेने पाकिस्तानी माध्यमांना केले आहे.
अमेरिकेने पाकिस्तानी तालिबान्यांवर केलेल्या लष्करी कारवायांमध्ये ठार झालेले दहशतवादी हे ‘शहीद’च आहेत, अशी भूमिका तालिबान्यांनी घेतली होती. मात्र पाकिस्तानातील काही जणांनी त्यास विरोध केला. या प्रकराचा संदर्भ घेत ‘तेहरीक ए तालिबान’चा प्रवक्ता शहीद याने असा विरोध करणाऱ्यांची तुलना पाकिस्तानी प्रसारमाध्यमांशी केली. ज्याप्रमाणे भारतीय सचिनचे गुणगान करताना न थांबणारी पाकिस्तानी प्रसारमाध्यमे पाकिस्तानी खेळाडूंना दूषणे देत आहेत, त्याचप्रमाणे ड्रोनहल्ल्यात ठार झालेल्या दहशतवाद्यांना शहीद म्हणण्यास विरोध करणारे पाकिस्तानी तालिबान्यांशी झुंजणाऱ्या पाक सैनिकांना मात्र तो दर्जा देण्यास विरोध करीत नाहीत आणि हे योग्य नाही असे तालिबान्यांनी सुचविले आहे.
तालिबानचा प्रवक्ता शहीदुल्ला शहीद याने ध्वनिचित्रफितीच्या माध्यमातून प्रसारमाध्यमांना सचिन गौरव कार्यक्रम थांबविण्यास सांगितले आहे. भारतीय खेळाडू असलेल्या सचिन तेंडुलकरचा पाकिस्तानी माध्यमांनी गौरव करावा ही दुर्दैवी गोष्ट आहे. एकीकडे ही स्तुती सुरू ठेवत काही माध्यमे आपल्याच देशांतील खेळाडूंना दूषणे देत आहेत.
तेंडुलकर कितीही श्रेष्ठ असला, तरी तो भारतीय असल्याने त्याचे कौतुक करू नका. पाकिस्तानचा कर्णधार मिसबाह-उल-हक हा कितीही वाईट असला तरी तो पाकिस्तानी असल्याने त्याचे कौतुक करा, अशी तंबीच या व्हिडीओमध्ये देण्यात आली आहे.
पाकिस्तानी माध्यमांनी सचिन तेंडुलकर याच्या १६ नोव्हेंबरच्या निवृत्तीचा क्षण भारतीय माध्यमांच्या खांद्याला खांदा भिडवूनच साजरा केला. त्याच्या निवृत्ती क्षणाचे भाषण सर्वच पाकिस्तानी माध्यमांनी थेट प्रक्षेपित केले होते. दुसऱ्या दिवशीच्या वृत्तपत्रांनाही भारतीय मातीचा रंग आला होता. सचिनच्या निवृत्तीमुळे क्रिकेट जगताच्या झालेल्या ‘हळहळ क्षणां’चे साक्षीदार डॉन, एक्स्प्रेस ट्रिब्यून, डेली टाइम्स या पाकिस्तानच्या बडय़ा वृत्तपत्रांची मुखपृष्ठेही झाली होती. पाकिस्तानमध्येच १९८९ साली क्रिकेटचा श्रीगणेशा करणाऱ्या सचिनच्या निवृत्तीबाबत पाकिस्तानी माध्यमांनी सीमाभेद केला नाही. अवघड प्रसंगांत संघाला यश मिळवून देण्याची ताकद असलेल्या सचिनच्या गुणांची पाकिस्तानी खेळाडूंशी तुलना माध्यमांनी अद्याप थांबविलेली नाही. यात पाकिस्तानमधील इंग्रजी माध्यमांसोबत ऊर्दू माध्यमेही आघाडीवर असल्याने
तालिबानला ‘सचिनस्तुती’ नकोशी झाली आहे. क्रिकेट-श्रीमंत सचिनच्या निवृत्तीमुळे हा खेळच गरीब झाला, असे म्हणणाऱ्या उर्दू वृत्तपत्र ‘इन्साफ’च्या भूमिकेबाबतही तालिबानने तीव्र नाराजी व्यक्त केली.