अफगाण सैनिकांशी चकमक  ३७ नागरिक ठार, ३५ जखमी

अफगाणिस्तानातील दक्षिण कंदाहार येथे विमानतळावर तालिबानी अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात ३७ नागरिक ठार झाले तर ३५ जण जखमी झालयाचे संरक्षण मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितले. चकमकीत ९ तालिबानी ठार झाले असून अजून चकमक सुरूच आहे. रात्रभर ही धुमश्चक्री सुरू होती. पाकिस्तानात अफगाणिस्तान विषयावर ‘हार्ट ऑफ पीस’ ही शांतता परिषद सुरू असताना ही घटना घडली आहे. प्रादेशिक शांतता प्रस्थापित करण्यासाठी ही परिषद आयोजित करण्यात आली आहे.
आजूबाजूच्या संकुलातील रहिवाशांनी सांगितले, की सैनिक महिला व मुलांना सोडून देण्यासाठी विनंती करताना दिसत होते. मुले रडत होती. नाटोचा संयुक्त अफगाणी तळ असलेल्या ठिकाणी तालिबानने हा हल्ला केला. सरकारने असा दावा केला, की अज्ञात हल्लेखोर यात मारले गेले पण जे काही लोक घरात लपून बसले आहेत, त्यांनी स्फोट व गोळीबाराचे आवाज अजूनही येत असल्याचे सांगितले.
कंदाहारचे गव्हर्नर शमीम खपलवाक यांनी सांगितले, की नागरिक व सैनिकांसह आठ जण मारले गेले आहेत. लष्कराचे कमांडर शहा वफादर यांनी सांगितले, की किमान अठरा जण मारले गेले आहेत. काल सायंकाळी सहा वाजता चकमकीस सुरुवात झाली. रात्री ही चकमक आणखी जोरदार होत गेली. महिला व सैनिकांना सोडून देण्याची विनवणी सैनिक करीत होते. काही प्रवासी भारताकडे जाणारे विमान रद्द झाल्याने नागरिकांसाठीच्या प्रतीक्षालयात अडकून पडले होते, असे विमानतळ संचालक अहमदुल्ला फैझी यांनी सांगितले. अफगाणिस्तानचे अध्यक्ष अशरफ घनी हे परिषदेसाठी पाकिस्तानला गेले आहेत. तालिबानने या हल्ल्याची जबाबदारी घेतली असून प्रवक्ता झबीनुल्ला मुजाहिद याने सांगितले, की दीडशे अफगाणी व परदेशी सैनिक यात ठार झाले आहेत. अर्थात तालिबान नेहमीच मृतांचा जास्त आकडा सांगत असते. तालिबानी नेता मुल्ला अख्तर मनसौर हा जखमी झाल्याच्या वृत्तानंतर हा हल्ला झाला असला, तरी तो त्याच्याच कमांडरच्या हातून चुकून गोळी सुटल्याने जखमी झाला आहे.