पाकिस्तानातील लोकशाही इतिहासजमा करण्याचे उद्दिष्ट तेहरिक-ए-तालिबान पाकिस्तानने ठरविले असल्याचे तालिबानचा प्रमुख हकीमुल्लाह मेहसूद याने म्हटले आहे. पाकिस्तानच्या वायव्य प्रांतातून मेहसूद याने मीडियाला पाठविलेल्या पत्रात सदर बाब स्पष्ट केली आहे.
पाकिस्तानात ११ मे रोजी सार्वत्रिक निवडणुका होणार असून त्यापूर्वी निवडणूक बैठका आणि प्रचार कार्यालयांवर अनेक हल्ले चढविण्यात आले आहेत. आता संघटनेचे सार्वत्रिक निवडणुकांकडे मोर्चा वळविला असून ज्येष्ठ नेते आणि विविध पक्षांचे नेते यांना लक्ष्य करण्याचे आदेश तालिबान्यांना देण्यात आले आहेत, असे मेहसूद याने सांगितले.
सरकारने आम्हाला शांतता चर्चेसाठी पाचारण केल्याने आम्ही आधीच उद्दिष्ट साध्य केले आहे. सरकारने चर्चेला पाचारण केल्याने राजकीयदृष्टय़ा आम्ही यशस्वी झाल्याचा दावाही मेहसूद याने केला आहे.
सिंध आणि खैबर पख्तुनवा प्रांतात अवामी नॅशनल पार्टी, मुत्ताहिद कोमी मुव्हमेण्ट, पाकिस्तान पीपल्स पार्टी यासारख्या पक्षांवर बॉम्बहल्ले केल्याची जबाबदारी तालिबानने स्वीकारली आहे. तालिबान्यांनी मुत्ताहिद कोमी मुव्हमेण्टच्या नेत्याला गोळी घालून ठार केले असून पाकिस्तान पीपल्स पार्टी आणि अवामी नॅशनल पार्टीच्या निवडणूक कार्यालयांवर करण्यात आलेल्या बॉम्बहल्ल्यात ४० जण ठार झाले आहेत, असेही मेहसूदने म्हटले आहे.
सदर तीन पक्ष निधर्मी धोरणांचे पुरस्कर्ते असून त्यांनी सत्तेवर असताना दहशतवाद्यांविरुद्ध लष्करी कारवाईचे आदेश दिले होते. त्यामुळे या तीन पक्षांना लक्ष्य केले जात आहे. या हल्ल्यांमुळे निवडणुकीतील सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे, असेही मेहसूद म्हणाला.