News Flash

भारत-चीन लष्करांदरम्यान आज उच्चस्तरीय चर्चेची चौथी फेरी

फिंगर ४ व फिंगर ८ दरम्यानच्या भागातून चीनने त्याच्या फौजा मागे घ्यायलाच हव्यात, हा आग्रह भारताने कायम ठेवला आहे.

संग्रहित छायाचित्र

‘कालबद्ध पद्धतीने’ पूर्व लडाखमधील तणाव कमी करण्याच्या आणि फौजा माघारी घेण्याच्या पुढील टप्प्यासाठीच्या कार्यपद्धतीला अंतिम रूप देण्याच्या उद्देशाने भारत व चीन यांच्या लष्करांदरम्यान उच्चस्तरीय चर्चेची चौथी फेरी मंगळवारी होणार असल्याची माहिती सरकारमधील सूत्रांनी सोमवारी दिली.

वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांची ही बैठक पूर्व लडाखमधील प्रत्यक्ष ताबा रेषेच्या भारतीय हद्दीत चुशुल येथे मंगळवारी सकाळी साडेअकरा वाजता सुरू होईल, असे या सूत्रांनी सांगितले.

पँगाँग त्सो आणि डेप्सांग यांच्यासह इतर भागांतून फौजा माघारी घेण्याचा दुसरा टप्पा सुरू करणे, तसेच मागच्या बाजूच्या तळांवरून फौजा आणि शस्त्रास्त्रे कालबद्ध रीतीने मागे घेणे यावर चर्चेचा मुख्य भर राहणार असल्याचेही सूत्रांचे म्हणणे आहे.

पँगाँग त्सो येथे भारत व चीनच्या सैनिकांमध्ये ५ मे रोजी झालेल्या संघर्षांनंतर तणाव उद्भवण्यापूर्वी पूर्व लडाखमधील सर्व भागांमध्ये जी परिस्थिती होती, ती ‘पूर्णपणे जैसे थे’ केली जावी, यावर भारत भर देईल असेही सूत्रांनी सांगितले.

दोन्ही देशांच्या फौजांमध्ये आठ आठवडे तणाव असलेल्या या उंच पर्वतीय भागात शांतता व स्थैर्य पुनस्र्थापित करण्याबाबतच्या आराखडय़ालाही दोन्ही बाजूंकडून अंतिम रूप दिले जाणे अपेक्षित आहे.

भारतीय प्रतिनिधी मंडळाचे नेतृत्व लेह येथील १४ कॉर्प्सचे कमांडर लेफ्टनंट जनरल हरिंदर सिंग, तर चिनी बाजूचे नेतृत्व दक्षिण झिनजियांग लष्करी क्षेत्राचे कमांडर मेजर जनरल लिउ लिन हे करण्याची शक्यता आहे.

चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने (पीएलए) यापूर्वीच गोग्रा, हॉट स्प्रिंग्ज आणि गलवान खोऱ्यातून फौजा परत घेण्याचे काम पूर्ण केले असून, भारताने मागणी केल्यानुसार गेल्या आठवडाभरात पँगाँग त्सो भागातील फिंगर ४च्या पर्वतरांगांवरील सैन्याची संख्याही मोठय़ा प्रमाणात कमी केली आहे.

फिंगर ४ व फिंगर ८ दरम्यानच्या भागातून चीनने त्याच्या फौजा मागे घ्यायलाच हव्यात, हा आग्रह भारताने कायम ठेवला आहे. या भागातील पर्वतस्कंधांचा (माऊंटन स्पर्स) उल्लेख ‘फिंगर्स’ असा केला जातो.

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल आणि चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांच्यात सुमारे दोन तास दूरध्वनीवरून संभाषण झाल्यानंतर गेल्या सोमवारपासून फौजा मागे घेण्याची औपचारिक प्रक्रिया सुरू झाली होती.

लष्करप्रमुखांची सीमाभागाला भेट

जम्मू : लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी सोमवारी आंतरराष्ट्रीय सीमेवरील आघाडीच्या भागांना भेट देऊन तेथील सुरक्षाविषयक परिस्थिती आणि जम्मू- पठाणकोट भागात तैनात करण्यात आलेल्या फौजांच्या युद्धसज्जतेचा आढावा घेतला.

सुरक्षाविषयक परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी कथुआ, सांबा, जम्मू व पठाणकोट यांचा समावेश असलेल्या रायझिंग स्टर कॉर्प्स ऑपरेशनल कमांड अंतर्गत येणाऱ्या भागांना लष्करप्रमुखांनी भेट दिली. पश्चिम कमांडचे प्रमुख लेफ्टनंट जनरल आर.पी. सिंग, रायझिंग स्टार कॉर्प्सचे कमांडिग अधिकारी ले.ज. उपेंद्र द्विवेदी, टायगर डिव्हिजनचे जीओसी मेजर जनरल व्ही.बी. नायर आणि जम्मू हवाई तळाचे कमांडिंग अधिकारी ए.एस. पठानिया यांनी लष्करप्रमुखांचे स्वागत केले, अशी माहिती संरक्षण खात्याच्या प्रवक्त्याने दिली. ले.ज. द्विदी यांनी लष्करप्रमुखांना युद्धसज्जता, सुरक्षाविषयक सोयींचे अद्ययावतीकरण आणि अंतर्गत सुरक्षाविषयक मुद्दय़ांची माहिती दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 14, 2020 12:10 am

Web Title: talks between india and china again today abn 97
Next Stories
1 ज्योतिरादित्य शिंदे यांच्या समर्थकांकडे महत्त्वाची खाती
2 पद्मनाभस्वामी मंदिराचे प्रशासकीय अधिकार राजघराण्याकडे
3 “भारतात बनवाट अयोध्या, खरी अयोध्या नेपाळमध्ये; प्रभू रामचंद्र नेपाळी”
Just Now!
X