जगभरामध्ये करोनाचा प्रादुर्भाव झाला आहे. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जगभरातील अनेक देशांनी शक्य ते सर्व उपाय अंमलात आणले आहेत. असं असतानाच जागतिक आरोग्य संघटनेने काही आठवड्यांपूर्वी हवेमधूनही करोनाचा संसर्ग होऊ शकतो यासंदर्भातील संशोधनामध्ये सत्यता असल्याचे सांगितल्यानंतर करोनाबद्दलची भिती आणखीनच वाढली आहे. त्यातच आता युनायटेड किंग्डम, नॉर्वे आणि अमेरिकेतील संशोधकांनी करोना संसर्गाचा थेट संबंध व्यक्तीच्या उंचीशी असल्याचा दावा केला आहे. करोनाचा संसर्ग कशामुळ होऊ शकतो यासंदर्भात संशोधन करणाऱ्या या संशोधकांनी आपल्या प्रयोगाच्या निष्कर्षामध्ये इंग्लंड आणि अमेरिकेत हवेच्या माध्यमातून करोना संसर्ग होत असल्याचे म्हटले आहे. त्याचप्रमाणे उंची जास्त असणाऱ्या व्यक्तींना करोनाचा धोका अधिक असल्याचेही या संशोधकांनी म्हटलं आहे.

नॉन प्री रिव्ह्यूड प्रकारचे जर्नल असणाऱ्या मेडीयारेक्सिव्हमध्ये (Medrxiv) छापून आलेल्या या संशोधनाच्या अहवालानुसार सहा फूट किंवा त्याहून अधिक उंची असणाऱ्या व्यक्तींना करोनाचा संसर्ग होण्याचा धोका अधिक असल्याचा दावा करण्यात आला आहे. उंचीने लहान असणाऱ्या व्यक्तींपेक्षा उंच व्यक्तींना करोनाचा संसर्ग लवकर होऊ शकतो असं संशोधनामधून दिसून आल्याचं संशोधकांचे म्हणणं आहे.

यामागील कारण काय?

संशोधकांनी व्यक्त केलेल्या अंदाजानुसार एखाद्या व्यक्तीच्या तोंडामधून शिंकताना किंवा खोकताना बाहेर पडलेले थुंकींचे थेंब ज्याला सलायव्हा ड्रॉपलेट्स काही अंतरापर्यंत हवेमधून प्रवास करतात. काही अंतरापर्यंत गेल्यानंतर गुरुत्वाकर्षणामुळे हे थेंब जमिनीवर पडतात. मात्र मायक्रोड्रॉपलेट्स हे अधिक काळ हवेमध्ये राहू शकतात आणि अधिक लोकांमध्ये संसर्गासाठी कारणीभूत ठरतात. ज्या ठिकाणी योग्य प्रकारे खेळती हवा नसेल किंवा वाऱ्याचा वेग ज्या बाजूने असेल त्या दिशेने हे ड्रॉपलेट्स लांब पर्यंतचे अंतर कापू शकतात असंही संशोधक म्हणतात.

उंची आणि करोना संसर्गासंदर्भात अभ्यास करणाऱ्या या संशोधकांच्या टीममध्ये असणारे मँचेस्टर विद्यापिठामधील प्राध्यापक इवान कॉन्टोपॅनटेलीस यांनी या संशोधनासंदर्भात एएफपीशी संवाद साधला. यावेळी त्यांनी उंची आणि करोना संसर्गाचा काही संबंध आहे का याबद्दल आम्ही अभ्यास केल्याचे सांगितले. ड्रॉपलेटच्या माध्यमातून होणारा संसर्ग हा हा एकमेव मार्ग नसून एरोसोल ट्रान्समिशनचीही शक्यता तितकीच असल्याचे इवान म्हणाले.  “इतर संशोधनामधूनही हे दिसून आलं आहे. मात्र आमच्या संशोधनामधून या दाव्यावर शिक्कामोर्तब झालं आहे. ड्रॉपलेट्सच्या माध्यमातून संसर्गाचे प्रमाण कायम असल्याने सोशल डिस्टन्सींगचा अवलंब केलाच पाहिजे. मास्क घातल्याने फायदा होत असल्याचेही दिसून येत आहे मात्र हे संसर्ग थांबवण्यासाठी पूर्णपणे प्रभावी ठरु शकत नाही. बंदिस्त जागांमधील हवा शुद्दीकरणासंदर्भातील संशोधन होणं आणि त्यावर विचार करणं गरजेचं आहे,” असं मत इवान यांनी मांडलं.

धूळ, कार्बन, धुके यामाध्यमातून म्हणजेच हवेच्या माध्यमातून होणाऱ्या संसर्गाला सामान्यपणे एरोसोल ट्रान्समिशन असं म्हणतात. एरोसोलमधील घटकांच्या माध्यमातून परसणारे मायक्रो ड्रॉपलेट्स हे हवेत जास्त काळ राहू शकतात आणि जास्त लोकांपर्यंत संसंर्ग पसरवू शकतात. हवेचा प्रवाह कोणत्या दिशेने आहे, वातावरण कसे आहे या नुसार हे एरोसोलच्या माध्यमातून होणारा संसर्गाचा प्रभाव किती दूरपर्यंत होतो याचा अंदाज बांधता येतो.