नववर्षांच्या स्वागतासाठी सज्ज होत येथील एजेके महाविद्यालयातील हॉटेल मॅनेजमेंट आणि कॅटरिंग सायन्सच्या विद्यार्थ्यांनी ४० फूट उंच केक तयार केला आहे. यापूर्वी चीनमध्ये तयार करण्यात आलेल्या ३२ फूट उंचीच्या केकचा विक्रम मोडल्याचा दावा या विद्यार्थ्यांनी केला आहे. १५ विद्यार्थ्यांनी मिळून हा केक १८ तासांत तयार केला. यासाठी २२०० अंडी, ३३५ किलो मैदा, २१५ किलो क्रीम, १२० किलो सुकामेवा आणि ६८० किलो साखर वापरण्यात आली. हा केक एकूण दहा थरांचा करण्यात आला आहे. यापूर्वी असा केक चीनने तयार केला होता. मात्र तो ३२ फूट उंचीचा आणि ८ थरांचा होता. लहानशा गावातून आलेले विद्यार्थी काय करू शकतात याचा अंदाज यावा हेच या मागील उद्दिष्ट असल्याचे महाविद्यालयाचे सचिव अजित कुमार लाल यांनी सांगितले.
हा केक नववर्षांच्या पूर्वसंध्येस कापण्यात येणार असून, विविध अनाथाश्रमांमध्ये पाठविला जाणार आहे.