पंजाबमधील अटारी सीमेवर उभारण्यात आलेल्या जगातील सर्वात उंच तिरंग्याला खराब हवामानाचा फटका बसला आहे. १२०x८० फुटांचा हा तिरंगा उभारण्यासाठी तब्बल साडेतीन कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. मात्र, अवघ्या काही दिवसांत येथील प्रतिकूल हवामानामुळे या तिरंग्याच्या देखभालीची मोठी समस्या जाणवू लागली आहे. ५ मार्चला हा तिरंगा फडकवण्यात आला होता. तेव्हापासून याठिकाणी दोन आठवड्यात दोनदा नवीन राष्ट्रध्वज लावावा लागला. या एका राष्ट्रध्वजाची किंमत एक लाख रुपये इतकी आहे. खूप उंचीवर असल्याने जोरदार वाऱ्यांमुळे तिरंग्याचे नुकसान होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे आता लवकरच देखभाल समितीकडून या समस्येवर उपाय काढण्यासाठी बैठक आयोजित केली जाणार आहे. राष्ट्रध्वजाची देखभाल करण्यात येणाऱ्या ट्रस्टकडे आता केवळ १२ राष्ट्रध्वजच उरले आहेत. त्यामुळे या समस्येवर लवकरात लवकर तोडगा काढणे गरजेचे बनले आहे.

आम्हाला अशाप्रकारे महिन्याला पाच राष्ट्रध्वज बदलायला लागले तर या हिशोबाने वर्षाला ६० राष्ट्रध्वज लागतील. यासाठी वर्षाला ६० लाख रुपये खर्ची पडतील. त्यामुळे आता हा राष्ट्रध्वज स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन, होळी आणि दिवाळी यांसारख्या सणांनाच फडकवण्यात यावा, असा प्रस्ताव येत्या बैठकीत मांडला जाण्याची शक्यता आहे.

हा राष्ट्रध्वज उभारताना त्यावर वाऱ्याचा कशाप्रकारे परिणाम होईल, याचा अभ्यास करण्यात आला नव्हता. सध्याचा राष्ट्रध्वज कापड आणि पॅराशूटसाठी वापरण्यात येणाऱ्या साहित्यापासून बनवण्यात आला आहे. मात्र, नव्या तिरंग्यात पूर्णपणे पॅराशूट मटेरियलचाच वापर करण्यात यावा, असा विचार सुरू आहे. पॅराशूट फॅब्रिकच्या वापरासाठी साधारण ४ लाखांच्या आसपास खर्च येणार असला तरी हा राष्ट्रध्वज सध्याच्या वातावरणात तीन महिन्यांपर्यंत टिकू शकतो. हा पर्याय खार्चिक असला तरी एकदा आजमावयाला हरकत नाही, असे तिरंग्याची उभारणी करणाऱ्या भारत इलेक्ट्रिक्ल्सचे कमल कोहली यांनी सांगितले.

अटारी सीमेवर हा तिरंगा उभारण्याला पाकिस्तानने विरोध केला होता. देशाच्या सीमेवर इतक्या उंचीचा खांब लावल्याने दोन्ही देशांमधील आंतरराष्ट्रीय करारांचे उल्लंघन आहे. तिरंगा फडकवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या खांबामध्ये दूरवरचे दृश्य टिपणारे कॅमेरे लावण्यात आले आहेत आणि या कॅमेऱ्यांच्या माध्यमातून हेरगिरी केली जाऊ शकते, असा आक्षेप पाकिस्तानने घेतला होता. पाकिस्तानच्या या कांगाव्याला भारताकडून प्रत्युत्तर देण्यात आले होते. भारतीय तिरंगा जिरो लाईनच्या २०० मीटर मागे आहे. त्यामुळे कोणत्याही कराराचे उल्लंघन झालेले नाही, असे भारताने स्पष्ट केले होते.