तामिळनाडूत ५२ वर्षांची गर्भवती महिला तिच्या कुटुंबियांसह रुग्णालयातून पळाल्याची घटना घडली आहे. महिलेला नऊ मुले असून ती दहाव्यांदा गर्भवती होती. प्रसूतीनंतर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करुन घे, असा सल्ला रुग्णालयाने दिला होता. ही शस्त्रक्रिया टाळण्यासाठीच ती रुग्णालयातून पळाल्याचा संशय आहे.

तिरुचिरापल्लीतील वेथियागुंडी येथे राहणाऱ्या अरायी (वय ५२) या महिलेला अशक्तपणा जाणवत असल्याने तिला रुग्णालयात नेण्यात आले. तपासणीत अरायी गर्भवती असल्याचे समोर आले. अरायी आणि तिचा पती आनंद या दाम्पत्याला आधीपासूनच नऊ मुले असून १३ वर्षांनी अरायी पुन्हा गर्भवती झाली. डॉक्टरांनी महिलेचे वय पाहता तिच्यावर तातडीने उपचाराची गरज असून प्रसूतीनंतर तिच्यावर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करावी, असा सल्ला तिच्या पतीला दिला होता.

वेथियागुंडी येथील ६० चौरस फुटाच्या झोपडीत हे दाम्पत्य आणि त्यांची पाच मुले राहतात. नऊ पैकी चार मुलांचे लग्न झाले असून ते आता दुसरीकडे राहतात. अरायी गर्भवती राहिल्यानंतर तिला याबाबतची माहितीच नव्हती. वयोमानामुळे मासिक पाळी येणे बंद झाली असेल, असा तिचा समज झाला होता. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार अरायीने यापूर्वी नऊ मुलांना घरातच जन्म दिला होता. ते दाम्पत्य रुग्णालयात प्रसूतीसाठी जात नाही. अरायीला प्रसूतीसाठी १८ ऑगस्ट ही तारीख देण्यात आली होती. अशक्तपणासाठी अरायीला चार महिन्यांपूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिला दोन बॉटल रक्तही देण्यात आले. मात्र, आता हे दाम्पत्य बेपत्ता झाल्याने डॉक्टरांनी महिलेच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली आहे.