देशभरात लहान मुलांवरील अत्याचाराचे सत्र अजूनही सुरुच आहे. तामिळनाडूत नऊ वर्षांच्या मुलीवर धावत्या ट्रेनमध्ये लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली असून या प्रकरणी पोलिसांनी ५६ वर्षांच्या नराधमास अटक केली आहे. के पी प्रेम अनंत असे या नराधमाचे नाव असून त्याने २००६ मध्ये आरके नगर मतदारसंघातून भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. नराधम हा वकील असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
शनिवारी रात्री नऊ वर्षांची पीडित मुलगी तिच्या कुटुंबीयांसह तिरुअनंतपूरम – चेन्नई एक्स्प्रेसने प्रवास करत होती. प्रवासात प्रेम अनंत हा पीडित मुलीच्या बर्थजवळ येऊन बसला. पीडित मुलीचे आई- वडिल लोअर बर्थवर झोपले होते आणि पीडित मुलगी मिडल बर्थवर झोपली होती. या दरम्यान नराधमाने पीडितेवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केला. पीडितेने आरडा-ओरडा केल्याने तिच्या आई- वडिलांना जाग आली. त्यांनी आणि अन्य प्रवाशांनी प्रेम अनंतला पकडले आणि पोलिसांच्या हवाली केले. इरोड स्थानकात पोलिसांनी त्याला अटक केली.
नराधमाने प्रवाशांना धमकी देखील दिली होती. ‘मी भाजपाशी संबंधित असून मी वकील आहे’, असे तो वारंवार सांगत होता. पोलीस चौकशीत त्याच्याकडे मद्रास हायकोर्टातील वकिलांच्या संघटनेचे ओळखपत्रही सापडले. तसेच त्याने २००६ मध्ये भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढवल्याचेही समोर आले आहे. मात्र, तो आता भाजपात फारसा सक्रीय नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. ‘प्रेम अनंत हा सध्या पक्षात सक्रीय नाही. तो स्थानिक पातळीवर भाजपासाठी काम करत असेल तर याबाबतची माहिती नाही. पण तो भाजपाशी संबंधित असला तरी त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे. अशा घटनांना पक्ष कधीच पाठिशी घालणार नाही, असे तामिळनाडूतील भाजपा नेत्यांनी सांगितले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on April 23, 2018 8:56 am