तामिळनाडू विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस-द्रमुकने आघाडी केली असून त्यामध्ये तामिळ मनिला काँग्रेस सहभागी होण्याची शक्यता तामिळनाडू काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ईव्हीकेएस इलनगोवन यांनी शनिवारी फेटाळून लावली.
माजी केंद्रीय मंत्री जी. के. वासन यांचा तामिळ मनिला काँग्रेस पक्ष काँग्रेस-द्रमुक आघाडीसोबत येणार का, असे विचारले असता इलनगोवन यांनी अशी शक्यता नसल्याचे वार्ताहरांना सांगितले. द्रमुकसोबत येत्या काही दिवसांतच जागावाटप जाहीर केला जाईल. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद द्रमुकचे नेते करुणानिधी यांच्याशी पुन्हा एकदा चर्चा करणार असून त्यानंतर दोन-तीन दिवसांत त्याची घोषणा केली जाईल, असेही ते म्हणाले.