तामिळनाडूमधील सत्ताधारी डीएमकेनं विधानसभेत वैद्यकीय प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या राष्ट्रीय पात्रता आणि प्रवेश परीक्षेतून (NEET)सूट देणारं विधेयक पास केलं आहे. या विधेयकाला भाजपा वगळता सर्वच पक्षांनी पाठिंबा दिला. त्यामुळे आता १२ वीच्या गुणांवर आधारित एमबीबीएस, बीडीएसमध्ये प्रवेश मिळणार आहे.

“आम्ही सत्तेवर येताच नीट परीक्षा रद्द करण्यासाठी पावलं उचलली. १२ वीच्या गुणांच्या आधारे वैद्यकीय शिक्षणात विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यासाठी सरकार पावलं उचलत आहे.”, असं मुख्यमंत्री स्टालिन यांनी विधेयक मांडताना सांगितलं होतं. विधेयकानुसार ज्या विद्यार्थ्याला वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा आहे, ते विद्यार्थी १२ वीच्या गुणांवर प्रवेश घेऊ शकतात. त्यामुळे नीट परीक्षा देण्याची आवश्यकता नसणार आहे. या विधेयकात सरकारने NEET परीक्षेत राज्यातील वैद्यकीय विद्यार्थ्यांना कायमस्वरूपी सूट देण्याची मागणी राष्ट्रपतींकडे केली आहे.

एका १९ वर्षीय विद्यार्थ्याने आत्महत्या केल्यानंतर नीट प्रवेश परीक्षेचं प्रकरण चांगलंच तापलं होतं. हा विद्यार्थी दोन वेळा नीटच्या परीक्षेला बसला होता. मात्र आवश्यक गुण न मिळवण्यात अपयशी ठरला होता. त्यानंतर त्याने टोकाचं पाऊल उचलल्याचं बोललं जात आहे. डीएमके नेत्यांनी त्याच्या निधानावर शोक व्यक केला होता. या घटनेनंतर एआयएडीएमके आणि डीएमके यांच्यात आरोप -प्रत्यारोप सुरू झाले आहेत. याला केंद्र सरकार जबाबदार असल्याचा राज्य सरकारचा आरोप आहे.