News Flash

अरररर घोळ झाला! भाजपाच्या प्रचार व्हिडीओत चिदंबरम यांच्या सुनेची डान्स क्लिप

काँग्रेसनं ठेवलं चुकीवर बोट

जाहीरनाम्याच्या व्हिडीओत झाली चूक.

तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी एकिकडे द्रमुक आणि काँग्रेसवर टीकास्त्र डागत असतानाच एक घोटाळा झाला. तामिळनाडू भाजपाने निवडणूक प्रचारासाठी तयार केलेल्या व्हिडीओमध्येच एक चूक झाल्याचं समोर आलं. काँग्रेसवर टीका करणाऱ्या भाजपाने माजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांच्या सुनेच्या नृत्याचीच क्लिप प्रचाराच्या व्हिडीओत समाविष्ट केली आहे. भाजपाच्या जाहीरनामा सांगणारा हा व्हिडीओ असून, या चुकीची तामिळनाडूत चर्चा रंगली आहे.

देशातील पाच राज्यांमध्ये निवडणुका होत असून, प्रचाराची धामधूम जोरात सुरू आहे. प्रचाराच्या मैदानातून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोपांच्या फैरी झाडत आहेत. तामिळनाडूमध्येही असंच काहीसं चित्र असून, भाजपाकडून द्रमुक आणि काँग्रेसला लक्ष्य केलं जात आहे. तामिळनाडू विधानसभा निवडणुकीसाठी भाजपानं जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. तो व्हिडीओ स्वरूपातही तयार करण्यात आला आहे.

हा व्हिडीओ तयार करत असताना तामिळनाडू भाजपाने त्यात काँग्रेसचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांची सून व कार्ती चिदंबरम यांची पत्नी स्त्रीनिधी चिदंबरम यांच्या डान्सची क्लिपही घेतली आहे. स्त्रीनिधी चिदंबरम या वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असून, त्या नृत्यांगनाही आहेत. स्त्रीनिधी यांच्या भरतनाट्यम करतानाच्या व्हिडीओतील काही भाग भाजपाने आपल्या जाहीरनाम्याच्या व्हिडीओत समाविष्ट केला आहे.

भाजपाच्या या चुकीवर तामिळनाडून काँग्रेसनं बोट ठेवलं असून, विनापरवानगी क्लिप वापरल्यावरून सुनावलही आहे. तामिळनाडू भाजपाला उद्देशून टीकाही केली आहे. “सहमती घेणं तुमच्यासाठी एक अवघड गोष्ट आहे, हे आम्ही समजू शकतो. पण, तुम्ही विनापरवानगी स्त्रीनिधी कार्ती चिदंबरम यांचा फोटो वापरू शकत नाही. यातून तुम्ही सिद्ध केलंय की तुमची मोहीम पूर्णपणे असत्य आणि प्रचारांनी भरलेली आहे,” अशी टीका तामिळनाडू काँग्रेसनं केली आहे.

दुसरीकडे या चुकीवरून तामिळनाडू भाजपा आता नेटकऱ्यांच्या रडारवर आली आहे. स्त्रीनिधी चिदंबरम यांच्या नृत्याची क्लिप समाविष्ट केल्यानं नेटकऱ्यांकडून भाजपाला ट्रोल केलं जात आहे. महत्त्वाचं म्हणजे स्त्रीनिधी चिदंबरम यांनीही यावर प्रतिक्रिया दिली असून, हे सगळं हास्यास्पद असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 31, 2021 10:12 am

Web Title: tamil nadu bjp uses dance clip of p chidambaram daughter in law in poll promotional video bmh 90
Next Stories
1 नवऱ्याने वर्षभरापासून सेक्स न केल्याने महिलेने दाखल केला एफआयआर
2 पत्नीसोबत जबरदस्ती होळी खेळण्यावर आक्षेप घेणाऱ्या भाजपा कार्यकर्त्याची हत्या; मोदींच्या मतदारसंघातील घटना
3 रेल्वे प्रवाशांना झटका, रात्रीच्या वेळी मोबाईल-लॅपटॉप नाही करता येणार चार्ज
Just Now!
X