‘गज’ चक्रीवादळग्रस्तांच्या पुनर्वसनाचा कार्यक्रम

तामिळनाडूतील ज्या जिल्ह्य़ांना ‘गज’ चक्रीवादळाचा तडाखा बसला आहे तेथे मदत आणि पुनर्वसन कार्यक्रम हाती घेण्यासाठी १५ हजार कोटी रुपयांचे अर्थसहाय्य द्यावे, अशी मागणी तामिळनाडू सरकारने केंद्र सरकारकडे केली आहे.

तामिळनाडूचे मुख्यमंत्री के. पलानीस्वामी यांनी गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आणि बाधित जिल्ह्य़ांमध्ये विविध क्षेत्रांसाठी केंद्रीय अर्थसाहाय्याची मागणी केली. गज चक्रीवादळात ६३ जण मरण पावल्याचेही पलानीस्वामी यांनी सांगितले.

पंतप्रधान मोदी यांच्याकडे आपण राज्यात किती नुकसान झाले त्याचा सविस्तर तपशील दिला आहे. राज्य सरकारने १५ हजार कोटी रुपयांच्या अर्थसाहाय्याची मागणी केली आहे, असे पलानीस्वामी यांनी येथे वार्ताहरांना सांगितले.

चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा अंदाज घेण्यासाठी केंद्रीय पथक पाठवावे आणि तातडीची मदत म्हणून जवळपास १५०० कोटी रुपये द्यावे, अशी मागणीही केंद्राकडे करण्यात आली आहे. मोदी यांनी लवकरच केंद्रीय पथक पाठविण्याचे आश्वासन दिले आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

चक्रीवादळामुळे ऊर्जा क्षेत्र मोठय़ा प्रमाणावर बाधित झाले असून त्यासह विविध विभागांमध्ये कायमस्वरूपी कामांसाठी १४ हजार ९१० कोटी रुपयांचे अर्थसाह्य़ द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. एक लाख विजेचे खांब कोसळले आहेत, त्याचप्रमाणे अनेक ऊर्जा उपकेंद्रांचे मुकसान झाले आहे. तामिळनाडू सरकारने तातडीची मदत म्हणून एक हजार कोटी रुपये दिले आहेत.