तामिळनाडू विधानसभेतील विश्वासदर्शक ठरावाला डीएमकेने सोमवारी मद्रास हायकोर्टात आव्हान दिले आहे. याप्रकरणावर तातडीने सुनावणी घ्यावी अशी मागणी डीएमकेने केली असून डीएमकेच्या याचिकेवर मंगळवारपासून सुनावणी होईल असे हायकोर्टाने म्हटले आहे.

तामिळनाडूत गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेले राजकीय नाट्य शनिवारी संपुष्टात आले होते. विधानसभेत मांडलेला विश्वासदर्शक ठराव मुख्यमंत्री इडापडी पलानीस्वामी यांनी जिंकला. मात्र धक्काबुक्की, गोंधळ आणि शेवटी विधानसभेत झालेली तोडफोड यामुळे हा विश्वासदर्शक ठराव वादग्रस्त ठरला. शनिवारी विधानसभेचे कामकाज सुरू होताच पलानीस्वामी यांनी विश्वासदर्शक ठराव मांडला. या ठरावावर गुप्त मतदान घ्यावे आणि आमदारांना मतदानाआधी आपापल्या मतदारसंघातील लोकभावना जाणून घेण्याची संधी द्यावी, अशी मागणी विरोधी पक्षांनी केली. मात्र विधानसभा अध्यक्ष पी. धनपाल यांनी ही मागणी फेटाळून लावली. यामुळे द्रमुकच्या सदस्यांनी गोंधळ घातला. शेवटी या गोंधळी आमदारांना सभागृहातून बाहेर काढण्यात आले. त्यानंतर विश्वासदर्शक ठरावावर घेण्यात आलेल्या मतदानात पलानीस्वामी यांच्या बाजूने १२२, तर ओ.पन्नीरसेल्वम यांच्याबाजूने फक्त ११ मते पडली होती.

विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर मुख्यमंत्री पलानीस्वामी यांनी सुटकेचा श्वास घेतला होता. मात्र सोमवारी मद्रास हायकोर्टाचे कामकाज सुरु होताच ज्येष्ठ वकिल आणि डीएमकेचे राज्यसभेतील खासदार आर. शन्मुगसुंदरम यांनी न्यायाधीशांचे लक्ष विधानसभेतील विश्वासदर्शक ठरावाकडे वेधले. यावर न्यायाधीशांनी डीएमकेला आधी याचिका दाखल करा असे निर्देश दिले. याचिका दाखल होताच मंगळवारपासून सुनावणी घेता येईल असेही हायकोर्टाने नमूद केले. यावरुन डीएमकेच्या याचिकेवर मंगळवारपासून सुनावणी होईल हे स्पष्ट झाले. गुप्त मतदान घ्यावे अशी डीएमकेची मागणी असून हायकोर्टातही हाच मुद्दा मांडला जाण्याची शक्यता आहे.

जयललिता यांच्या निधनानंतर पक्षाची आणि सरकारची सूत्रे हाती घेण्यासाठी सरसावलेल्या व्ही. के. शशिकला यांच्याविरोधात ओ. पन्नीरसेल्वम यांनी बंड पुकारले. बेहिशोबी मालमत्ता प्रकरणात न्यायालयाने शशिकला यांना दोषी ठरवल्यानंतर त्यांनी आपले विश्वासू इडापडी पलानीस्वामी यांची पक्षाच्या विधिमंडळ नेतेपदी वर्णी लावली होती.