तामिळनाडूमधील अण्णा द्रमूक सरकार चेन्नईसहित राज्यातील अनेक भागात अम्मा पेट्रोल पंप सुरू करणार आहे. शुक्रवारी यासंबंधी सरकारने घोषणा केली. राज्याचे अन्न व ग्राहक संरक्षण मंत्री कामराज यांनी ही सुविधा सरकारी गोदामांमध्ये सुरू करणार असल्याचे या वेळी सांगितले. राज्यात सध्या ‘अम्मा’ नावाने अनेक योजना कार्यान्वित आहेत. त्यात आता पेट्रोल पंपची भर पडली आहे.

लोकांच्या गरजा लक्षात घेऊन आता आम्ही तेल कंपन्यांच्या सहयोगाने राज्यात पेट्रोल पंप सुरू करणार आहोत. सध्या राज्यातील ९ जिल्ह्यांमध्ये हे आऊटलेट्स सुरू केले जातील, अशी माहिती कामराज यांनी दिली. सरकारचे राज्यात २२१ गोदाम आहेत.

राज्याच्या माजी मुख्यमंत्री दिवंगत जयललिता यांच्या कार्यकाळात सरकारने ‘अम्मा’ नावाने अनेक योजना सुरू केल्या होता. यामध्ये कँटीन, पिण्याचे पाणी, सिमेंट, मीठ, बेबी केअर किट, कॉल सेंटर्स आणि औषधाशी निगडीत अनेक योजना या ‘अम्मा’ या नावाने ओळखल्या जातात. जयललिता यांना त्यांचे समर्थक ‘अम्मा’ म्हणत.

राज्यातील मंत्री हे नेहमी ‘अम्मा’ योजनांचे यश सांगताना थकत नाहीत. आतापर्यंत राज्यात १११ ‘अम्मा’ फार्मसी ही औषधाची दुकाने सुरू आहेत. या दुकानांमध्ये ग्राहकांना १५ टक्के सवलतीने औषधे मिळतात. तसेच ‘अम्मा’ कँटीनमधून सवलतीच्या दरात नाश्ता, जेवण मिळते. सिमेंटही सवलतीने दिले जाते. त्यामुळे ‘अम्मा’ नावाच्या या योजना तामिळनाडूत लोकप्रिय आहेत.