काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांचा आरोप

तामिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित हे तेथील सरकारचे खरे प्रमुख नाहीत. ते प्रशासनाचे प्रमुख असल्याचा दावा करून दिशाभूल करीत आहेत, कुठल्याही राज्याच्या प्रशासनाचा प्रमुख हा मुख्यमंत्री असतो पण तामिळनाडूचे मुख्यमंत्री हे केंद्राच्या दहशतीखाली वावरत आहेत, त्याचा गैरफायदा राज्यपालांनी घेतला आहे असा आरोप काँग्रेस नेते पी.चिदंबरम यांनी केला आहे.

ते म्हणाले की, राज्यपाल हे नाममात्र प्रमुख असतात व खरे प्रमुख नाही कारण खरे प्रमुख तर मुख्यमंत्री असतात त्यामुळे प्रशासनाशी संबंधित माहिती मागवण्याचा व लोकांना थेट भेटण्याचा अनिर्बंध अधिकार वापरून ते त्यांच्या अधिकार मर्यादेचे उल्लंघन करीत आहेत. आता मुख्यमंत्री पलानीस्वामी यांनी राज्य प्रशासनाला राज्यपालांच्या कार्यक्रमात सहभागी होण्यास नकार देण्याचे आदेश दिले पाहिजेत.

तामिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी काल असे म्हटले होते की, मी सामान्य लोकांशी माझ्या दौऱ्यांमध्ये संपर्क सुरूच ठेवणार असून अधिकाऱ्यांनाही भेटून चर्चा करणार आहे.

राज्यपाल हे केंद्राच्या सांगण्यावरून हस्तक्षेप करीत असल्याच्या आरोपाचा राजभवनने इन्कार केला आहे. कुठलेही पुरावे नसताना हे आरोप करण्यात आले असून या आरोपाकडे दुर्लक्ष करणेच योग्य आहे. ज्यांना राज्यघटनेतले काही समजत नाही त्यांनी अशी विधाने करू नयेत, ती बेकायदेशीर आहेत. राज्यपाल हाच राज्याचा घटनात्मक प्रमुख असतो त्याची कलमे आम्ही येथे जाहीर करीत आहोत.

राज्यपाल हे लोकहितासाठी काम करीत असून लोकांच्या कल्याणाचाच त्यांचा हेतू आहे. राज्यपाल हे घटनात्मक प्रमुख असतात त्यामुळे त्यांचा मान राखला गेला पाहिजे. त्यांचा अनादर करणे हे लोकशाहीला मारक आहे.