सीएमएस-इंडियाच्या पाहणी अहवालामध्ये स्पष्ट

तामिळनाडू हे देशातील सर्वात भ्रष्ट राज्य असल्याचे सीएमएस-इंडियाने केलेल्या पाहणीत आढळून आले आहे. देशातील १३ मोठय़ा राज्यांमध्ये केलेल्या पाहणीतून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे.

संबंधित राज्यातील नागरिकांची सरकारी कर्मचाऱ्यांबद्दलची मते, लाच मागण्याचे प्रमाण, भ्रष्टाचारविरोधी चळवळी आदी विविध स्वरूपाचे प्रश्न नागरिकांना विचारण्यात आले. त्यांनी दिलेल्या उत्तरांवरून सर्वाधिक भ्रष्ट आणि कमीत कमी भ्रष्ट राज्यांची यादी तयार करण्यात आली. त्यामध्ये तामिळनाडू पहिल्या क्रमांकावर तर तेलंगण दुसऱ्या क्रमांकावर आहे. सरकारी कामांसाठी तेलंगणमधील ७३ टक्के नागरिकांना लाच द्यावी लागल्याचे उघड झाले आहे. त्याचबरोबर पंजाब, गुजरात आणि आंध्र प्रदेशमध्ये भ्रष्टाचाराचे प्रमाण जास्त असल्याचेही उघड झाले आहे.

देशातील ७५ टक्के लोकांच्या मते गेल्या एका वर्षांत भ्रष्टाचाराच्या प्रमाणात काहीही बदल झालेला नाही, पण २००५च्या तुलनेत भ्रष्टाचाराचे प्रमाण निम्म्याहून कमी झाले आहे, असेही या पाहणीतून समोर आले आहे. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार या राज्यांमध्ये भ्रष्टाचारविरोधी चळवळी मोठय़ा प्रमाणावर सक्रिय झाल्याचेही स्पष्ट झाले आहे.