‘ब्लू व्हेल गेम’मुळे भारतात अल्पवयीन मुलांनी आत्महत्या केल्याच्या घटना वाढत असतानाच आता हे प्रकरण न्यायालयात पोहोचले आहे. ब्लू व्हेल गेमची लिंक शेअर करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश मद्रास हायकोर्टाच्या मदुराई खंडपीठाने तामिळनाडू पोलिसांना दिले आहेत. तसेच यासंदर्भात केंद्र सरकार आणि तामिळनाडू सरकारने ८ सप्टेंबरपर्यंत कोर्टात उत्तर द्यावे, असेही हायकोर्टाने म्हटले आहे.

मदुराई विद्यापीठात शिकणाऱ्या विघ्नेश या विद्यार्थ्याने गेल्या आठवड्यात आत्महत्या केली होती. ब्लू व्हेल गेममुळे त्याने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या घटनेनंतर पेशाने वकील असलेल्या कृष्णमूर्ती यांनी हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली. या याचिकेवर सोमवारी सुनावणी झाली. मद्रास हायकोर्टाने ब्लू व्हेल गेमप्रकरणी राज्य सरकार आणि केंद्र सरकारला ८ सप्टेंबरपर्यंत न्यायालयासमोर भूमिका मांडण्याचे निर्देश दिले. तामिळनाडूतील सायबर सेल पोलिसांनीही हायकोर्टात बाजू मांडली. ब्लू व्हेल गेमच्या लिंक्स ब्लॉक करण्यात आल्या असून, राज्यात हा गेम कोणीही डाऊनलोड करु शकणार नाही, असे पोलिसांनी हायकोर्टात सांगितले. पोलिसांची बाजू ऐकून घेतल्यावर हायकोर्टाने पोलिसांना ब्लू व्हेल गेम शेअर करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले. तसेच यासंदर्भात आता हायकोर्टाने मद्रास आयआयटीचे मतही मागवले आहे.

‘ब्लू व्हेल गेम’मुळे भारतातही आत्महत्या केल्याच्या घटना वाढत आहे. रविवारी मध्य प्रदेशमध्ये अकरावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने या गेममुळे आत्महत्या केल्याचे समोर आले होते. तर त्यापूर्वी मदुराई विद्यापीठात शिकणाऱ्या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना घडली होती. आत्महत्येपूर्वी त्या विद्यार्थ्याने मित्रांना ब्लू व्हेल गेम आवडत असल्याचे सांगितले होते. हा गेम रशियातील एका तरुणाने तयार केला असून, या गेमच्या लिंक्स हटवण्याचे आदेश केंद्र सरकारने गुगल, फेसबुक, ट्विटर आणि अन्य साईट्सना दिले होते.