करोना व्हायरसमुळे देशात आणखी एक मृत्यू झाला आहे. तामिळनाडूत मदुराईमध्ये बुधवारी सकाळी एका ५४ वर्षीय व्यक्तीचा करोनामुळे मृत्यू झाला. करोना व्हायरसमुळे तामिळनाडूत झालेला हा पहिला मृत्यू आहे अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री सी. विजयभास्कर यांनी दिली. करोना व्हायरसमुळे देशाच्या वेगवेगळया आतापर्यंत ११ जणांचा मृत्यू झाला आहे.

मृत व्यक्तीला करोना बरोबर अनियंत्रित मधुमेह, हायपरटेंशनचा आजार होता. आम्ही आमच्यापरीने सर्वोत्तम प्रयत्न करुनही रुग्णाला वाचवू शकलो नाही असे विजयभास्कर म्हणाले. राजाजी हॉस्पिटलमध्ये या रुग्णाचे निधन झाले. तामिळनाडूत करोना बाधितांची संख्या १८ पर्यंत पोहोचली आहे. मंगळवारी आणखी सहा नवीन रुग्ण आढळून आले. यात तीन महिला रुग्णांचा समावेश आहे.

तामिळनाडूत मृत्यू झालेल्या रुग्णाने परदेश प्रवास केला नव्हता. त्याला कुठलीही ट्रॅव्हल हिस्ट्री नव्हती. अनियंत्रित मधुमेह, हायपरटेंशनबरोबर श्वसनाचाही विकार होता. हा रुग्ण स्टेरॉइडवर होता. देशातील करोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेऊन पंतप्रधान मोदींनी काल रात्री देशाला उद्देशून केलेल्या भाषणात संपूर्ण देशात २१ दिवसांसाठी लॉकडाउनची घोषणा केली. इटली, स्पेन, इराणमध्ये आज करोना व्हायरसमुळे जी स्थिती आहे, तशी परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.