तमिळनाडूने अनेक दशकांच्या द्विभाषा सूत्राचा पुरस्कार करताना नवीन शैक्षणिक धोरणातील त्रिभाषा सूत्रास विरोध केला आहे. सत्ताधारी अद्रमुकने सोमवारी केंद्राने नवीन शैक्षणिक धोरणात लागू केलेले त्रिभाषा सूत्र फेटाळले असून सध्याच्या पद्धतीत आम्ही काही बदल करणार नाही असा इशारा दिला आहे.

मुख्यमंत्री पलानीस्वामी यांनी सांगितले की, नवीन शैक्षणिक धोरणातील त्रिभाषा सूत्र हे वेदनादायी असून पंतप्रधान मोदी यांनी त्रिभाषा सूत्राचा फेरविचार करावा. आमच्या राज्यात अनेक दशके द्विभाषा सूत्र असून आम्ही त्यात बदल करणार नाही. द्रमुकसह विरोधी पक्षांनी अशी मागणी केली होती की, राज्य सरकारने त्रिभाषा सूत्र तातडीने फेटाळावे व द्विभाषा सूत्रात बदल करू नये. मुख्यमंत्री पलानीस्वामी यांनी या बाबत मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांशी चर्चा केली. द्रमुकने मुख्यमंत्री पलानीस्वामी यांना पत्र पाठवले असून त्यात नवीन शैक्षणिक धोरणाला विरोध करणारा ठराव मंत्रिमंडळाने संमत करावा अशी मागणी केली आहे.

पलानीस्वामी यांनी म्हटले आहे की, केंद्राचे त्रिभाषा सूत्र तमिळनाडू कदापि मान्य करणार नाही. द्वैभाषिक सूत्र कायम राहील. केवळ तमिळ व इंग्रजी या दोनच भाषा शिकवल्या जातील. त्यांनी उपमुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम, उच्च शिक्षण मंत्री के. पी. अनबझागन व शालेय शिक्षण मंत्री के. ए. सेनगोटियन यांच्याशी चर्चा केली. राज्यांना स्वतंत्र धोरण राबवण्याची परवानगी असावी असे सांगून त्यांनी म्हटले आहे की, द्वैभाषिक सूत्र लागू राहील.

शैक्षणिक धोरणात असे म्हटले होते की, पाचवीपर्यंत मातृभाषेतून किंवा प्रादेशिक भाषेतून शिक्षण द्यावे. त्याशिवाय बोर्डाच्या परीक्षांचे महत्त्व कमी करावे. या प्रस्तावांना तमिळनाडूत द्रमुकने विरोध केला असून विरोधी पक्षनेते स्टालिन यांनी हा हिंदी व संस्कृत भाषा लादण्याचा डाव असल्याचे म्हटले आहे.

१९६० मध्ये द्रमुकने हिंदी विरोधात आंदोलन केले होते त्याचे सूर तमिळ जनमानसाशी जुळले होते. १९६७ मध्ये द्रमुकचे सरकार सत्तेवर येण्यास भाषा धोरण हेच कारण होते. त्यावेळी अण्णादुराई यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारकडून तमिळनाडूत द्रमुकने सत्ता हिसकावली होती. अण्णादुराई, एम. जी. रामचंद्रन व जे. जयललिता हे सगळेच हिंदी भाषा लादण्याच्या विरोधात होते.

सध्याचे मुख्यमंत्री पलानीस्वामी यांनी जून २०१९ मध्ये पंतप्रधानांना पत्र पाठवून द्विभाषा सूत्रावर भर दिला होता. नवीन शैक्षणिक धोरणात अनेक कलमे हिंदी व संस्कृत भाषा व वेदिक संस्कृती लादणारी असून त्याला आमचा विरोध आहे असे द्रमुक प्रणित आघाडीने म्हटले आहे.