चेन्नई : अरुंधती रॉय यांचे ‘वॉकिंग विथ दि कॉम्रेड्स’ हे पुस्तक तमिळनाडूतील एका सरकारी विद्यापीठाच्या एम.ए. इंग्रजी अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याविरुद्ध अ.भा. विद्यार्थी परिषदेसह अनेकांनी तक्रारी केल्यानंतर, या विद्यापीठाने ते अभ्यासक्रमातून हटवले आहे.

या पुस्तकात नक्षलवाद्यांचे उदात्तीकरण करण्यात आले असून, त्यातील मजकूर राष्ट्रविरोधी आहे, असा आरोप अभाविप व इतरांनी केला होता.

छत्तीसगडमधील नक्षलवाद्यांच्या अड्डय़ांची पाहणी केल्यानंतर त्यांचे इतिवृत्त, तसेच हे लोक जंगलात कशा प्रकारे काम करतात याचे चित्रण असलेले हे पुस्तक अभ्यासक्रमातून परत घेण्याच्या कार्यवाहीला द्रमुक आणि माकप या विरोधी पक्षांनी विरोध केला आहे.

या पुस्तकाचा तिरुनेलवेली येथील मनोन्मनियम सुंदरनार विद्यापीठाशी (एमएसयू) संलग्न असलेल्या महाविद्यालयांतील एम.ए. इंग्रजी साहित्याच्या तिसऱ्या सत्राच्या अभ्यासक्रमात २०१७-१८ सालापासून समावेश करण्यात आला होता. ‘गेल्या आठवडय़ात आम्हाला अभाविपकडून पुस्तकाविरुद्ध लेखी तक्रार मिळाली, तसेच त्यानंतर अनेक निवेदनेही प्राप्त झाली. आमच्या कार्यकारी समितीच्या सदस्यांनीही याबाबत तक्रारी केल्या’, असे एमएसयूचे कुलगुरू के. पिचुमणी यांनी पीटीआयला सांगितले.

पुस्तकातील ‘वादग्रस्त’ मजकुराचा उल्लेख करून या तक्रारकर्त्यांनी ते अभ्यासक्रमातून हटवण्याची मागणी केली होती, असे ते म्हणाले.