तामिळनाडूतील तिरुवन्नामलाईत फिरायला आलेल्या रशियन महिलेला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी सहा संशयितांना ताब्यात घेतले आहे.

रशियातून भारतात भ्रमंतीसाठी आलेली २१ वर्षीय महिला तामिळनाडूतील तिरुवन्नामलाई येथे गेली होती. महिलेला अज्ञात व्यक्तींनी गुंगीचे औषध देऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. सोमवारी एका तरुणाने तिला रुग्णालयात दाखल केले होते. महिला हॉटेलमधील खोलीत बेशुद्धावस्थेत आढळल्याचे त्याने सांगितले होते. वैद्यकीय तपासणीत महिलेवर बलात्कार केल्याचे निष्पन्न झाल्याने रुग्णालयातील डॉक्टरांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली.

पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा नोंदवत तपासाला सुरुवात केली आहे. महिलेला फक्त रशियन भाषा कळत असल्याने तिचा जबाब घेताना अडचणी येत होत्या. अखेर पोलिसांनी दुभाषकाच्या मदतीने महिलेचा जबाब घेतला. पोलिसांनी या प्रकरणात सहा संशयितांना ताब्यात घेतले आहे. महिला १२ जुलै रोजी फिरायला तामिळनाडूत आली होती. सहा पैकी एका संशयिताने महिलेला रुग्णालयात दाखल केले होते. त्या तरुणाने पोलीस चौकशीत महिलेच्या संमतीनेच तिच्याशी शरीरसंबंध ठेवल्याचा दावा केला आहे. शनिवारी रात्री महिलेने मला तिच्या हॉटेलमध्ये बोलावले होते, असे त्याने म्हटले आहे. सोमवारी सकाळी मी पुन्हा महिलेच्या खोलीत गेलो असता ती बेशुद्धाअवस्थेत आढळली, असे त्याने पोलिसांना सांगितले.