तामिळनाडूतील तुतिकोरिन येथे वेदांतच्या स्टरलाइट कॉपर प्रकल्पाच्या विस्ताराला मद्रास हायकोर्टाने बुधवारी स्थगिती दिली. मंगळवारी या प्रकल्पाविरोधात सुरु असलेल्या आंदोलनात पोलिसांनी गोळीबार केल्याने ९ जणांचा मृत्यू झाला होता.

तुतिकोरिन येथे वेदांत स्टरलाइट कॉपर प्रकल्प असून या प्रकल्पाची क्षमता वाढवण्यासाठी विस्तार केला जाणार आहे. यासाठी काम देखील सुरु झाले होते. गेल्या १०० दिवसांपासून या प्रकल्पाविरोधात स्थानिक लढा देत असून या प्रकल्पामुळे परिसरात प्रदूषण होत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. भूजल प्रदुषित होत असून यामुळे आरोग्याला धोका निर्माण झाल्याचे स्थानिकांनी म्हटले होते. या प्रकल्पाविरोधात सुरु असलेल्या निदर्शनांनी मंगळवारी हिंसक वळण घेतले होते. पोलिसांनी केलेल्या गोळीबारात नऊ जणांचा मृत्यू झाला होता. तर २० जण जखमी झाले होते. मुख्यमंत्री पलानीस्वामी यांनी गोळीबार प्रकरणाच्या न्यायालयीन चौकशीचे आदेश दिले असून मृतांच्या कुटुंबीयांना १० लाख रुपयांची मदतही देण्यात आली आहे. दुसरीकडे या प्रकल्पाविरोधात मद्रास हायकोर्टात याचिका दाखल झाली होती. हायकोर्टाने बुधवारी या याचिकेवरील सुनावणीदरम्यान प्रकल्पाच्या विस्तारास स्थगिती दिली आहे.